ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 19 - अजनीतील जादूमहल जवळ एका दुकानात हवा भरण्याच्या (एअर कॉम्प्रेसर) मशीनचा जोरदार स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. शरद अजाबराव राऊत (वय ३५) असे स्फोटात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
जखमी असलेल्या रमेश शंकर बागडे (वय ४२, रा. बिडीपेठ) याचे जादूमहल जवळच्या सावित्रीबाई फुले झोपडपट्टीत मित्तल इलेक्ट्रीकल्स नामक छोटेसे दुकान आहे. शरद हा रमेशचा मित्र होय. जोडधंदा म्हणून रमेशने वाहनात हवा भरण्याची (एअर कॉम्प्रेसर) एक जुनी मशीन ४,५०० रुपयात आजच विकत घेतली होती. ही मशीन घेऊन रमेश आणि शरद दुपारी २.३० वाजता रमेशच्या दुकानात आले. त्यांनी मशीन सुरू करताच मोठा स्फोट झाला आणि शरद तसेच रमेश दोघेही गंभीर जखमी झाले. स्फोट एवढा जोरदार होता की मोठा आवाज होऊन आजूबाजूच्या घरांना हादरा बसला. शरद मशीनच्या बाजूलाच होता. त्यामुळे त्याचा एक पाय पुरता छिन्नविछिन्न झाला. गंभीर अवस्थेत या दोघांना मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना रात्री ८ च्या सुमारास डॉक्टरांनी शरदला मृत घोषित केले. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर अजनी पोलीस घटनास्थळी आणि नंतर मेडिकलमध्ये पोहचले. या घटनेमुळे परिसरात काही वेळ प्रचंड दहशत निर्माण झाली होती.
कामाच्या शोधात आला, अन्...
स्फोटात ठार झालेला शरद मूळचा वलनी येथील रहिवासी होय. त्याला पत्नी आणि तीन वर्षांची मुलगी आहे. शरदसोबत पटत नसल्यामुळे त्याची पत्नी तिच्या मुलीसह फुले झोपडपट्टीत माहेरी राहायला आली. पत्नी व मुलीची आठवण येत असल्यामुळे नागपुरातच कामधंदा करून येथेच राहायच्या विचाराने आज शरद नागपुरात आला. मित्र रमेशकडे गेल्यानंतर त्याने येथे काम करण्याची इच्छा बोलून दाखवली. दरम्यान, रमेशने हवा भरण्याची मशीन विकत घेतल्याचे सांगून ती आणण्यासाठी शरदला सोबत नेले. शरद आणि रमेश दोघे मशीन घेऊन आले आणि ‘ट्रायल’ घेण्यासाठी या दोघांनी ती मशीन सुरू करून पाहिली आणि स्फोट झाला अन् त्यात शरदचा जीव गेला.