लाेकमत न्यूज नेटवर्क
बेलाेना : सततची नापिकी आणि दीड वर्षापासून सुरू असलेले काेराेना संक्रमण यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजुरांच्या आर्थिक संकटात भर पडली आहे. त्यातच महावितरण कंपनीने अवाजवी विजेचे दर वाढवून बिलाची आकारणी व सक्तीची वसुली करायला सुरुवात केली आहे. बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने सामान्य नागरिकांना पावसाळ्यात रात्र अंधारात काढण्याची वेळ ओढवली आहे.
काेराेना संक्रमण रोखण्यासाठी शासनाने दीर्घकाळ लाॅकडाऊन जाहीर केल्याने ग्रामीण भागातील छाेटे-माेठे उद्याेग ठप्प झाले असून, छाेटे व्यावसायिक आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रतिकूल वातावरण आणि किडींचा प्रादुर्भाव यामुळे पिकांचे उत्पादन घटत असून, उत्पादन खर्च वाढला आहे. त्यातच बाजारात शेतमालाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी ताेटा पडत आहे. एवढेच नव्हे तर बहुतांश शेतकऱ्यांना मागील वर्षीसाेबतच याही वर्षी दुबार पेरणीला सामाेरे जावे लागले. किडी व नैसर्गिक कारणांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाईदेखील शासन द्यायला तयार नाही.
या प्रतिकूल परिस्थितीत राज्य शासनाने विजेचे दर वाढविले आहे. त्यातच बिलांची अवाजवी आकारणी करून महावितरण कंपनीने वीज बिलांची सक्तीने वसुली करायला सुरुवात केली आहे. त्यासाठी महावितरण कंपनीचे कर्मचारी घराेघरी जाऊन नागरिकांना वीज बिल भरण्याची सूचना करीत आहेत. आर्थिक अडचणींमुळे अनेकांना वेळीच वीज बिल भरणे शक्य न झाल्याने थकीत बिलाची रक्कम वाढत गेली.
अनेकांना बिलाची माेठी रक्कम भरणे शक्य न झाल्याने त्यांच्याकडील वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटाही महावितरण कंपनीने सुरू केला आहे. त्यामुळे संबंधितांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेता, राज्य शासनाने सक्तीची वीज बिल वसुली व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.