लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्राम पंचायतींमध्ये कार्यरत संगणक परिचालकांना गेल्या पाच-सहा महिन्यापासून मानधन मिळाले नाही. मानधनाची मागणी केली असता, कामावरून कमी करण्याचा दम दिला जातो. त्यामुळे बुधवारी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना (नागपूर जिल्हा) यांच्या नेतृत्वात या परिचालकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील प्रवेशद्वारापुढे ठिय्या आंदोलन करीत नारे-निदर्शने केलीत. जिल्ह्यातील ६७६ ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालक कार्यरत आहे. त्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना ऑनलाईन दाखले, प्रमाणपत्र स्थानिक पातळीवरच मिळते. यासाठी सीएससी-एसपीव्ही नामक कंपनी नेमली आहे. ग्रामपंचायतीकडून या कंपनीला संगणक परिचालक यांच्या वेतनासाठी एकमुश्त निधी दिला जातो. हा निधी ग्रा.पं.ला मिळणाऱ्या वित्त आयोगातून दिला जातो. संगणक परिचालक हे कंपनीच्या अखत्यारीत येतात. गेल्या एप्रिल महिन्यांपासून कंपनीने कर्मचाऱ्यांचे मानधन अदा केले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. मात्र, यानंतर कंपनीच्या तालुका समन्वयकांनी परिचालकांना आंदोलन मागे न घेतल्यास कामावरून कमी करण्यात येईल, असा इशारा दिल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष गणेश राहांगडाले यांनी दिली. राहांगडाले यांनी सांगितले की, कंपनीने दिलेल्या या इशाऱ्याचा आम्ही निषेध करीत असून, जिल्हा परिषदेने या कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्याकडे केली आहे. तसेच थकीत मानधन अदा झाल्याशिवाय परिचालक कुठल्याही प्रकारचे काम करणार नाही, असा इशाराही संघटनेच्यावतीने दिला आहे. आंदोलनात अध्यक्ष सोनू तितरमारे, प्रदीप काटे, गणेश राहांगडाले, आशिष कुकडे, सुनील नेवारे, राकेश चिमणकर आदी उपस्थित होते.
पाच महिन्यापासून संगणक परिचालक बिनपगारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 9:46 PM
ग्राम पंचायतींमध्ये कार्यरत संगणक परिचालकांना गेल्या पाच-सहा महिन्यापासून मानधन मिळाले नाही. मानधनाची मागणी केली असता, कामावरून कमी करण्याचा दम दिला जातो. त्यामुळे बुधवारी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना (नागपूर जिल्हा) यांच्या नेतृत्वात या परिचालकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील प्रवेशद्वारापुढे ठिय्या आंदोलन करीत नारे-निदर्शने केलीत.
ठळक मुद्देजि.प.च्या प्रवेशद्वारापुढे दिला ठिय्या