लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (खापरखेडा) : वेकोलि चनकापूर वसाहतीतील एका वेकोलि कर्मचाऱ्याची मुलगी दिल्लीवरून ८ जून रोजी विमानाने प्रवास करून चनकापूर येथे घरी परत आली. या दरम्यान संबंधित स्थानिक प्रशासनाला मुलीच्या वडिलांकडून माहिती देण्यात आली नाही. यानंतर या मुलीला कोरोनाची लागण झाली. यासंदर्भात प्रशासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी नागपूर क्षेत्र महाव्यवस्थापक डी.एम. गोखले यांनी कोरोनाबाधित मुलीच्या वडिलांना निलंबित केले आहे. निलंबित कर्मचारी वकोलिच्या सिल्लेवाडा खाणीतील मायनिंग विभागात कार्यरत आहे. चनकापूर वेकोलि बी-टाईप वसाहतीत राहणारी मुलगी दिल्ली येथे शिक्षणासाठी गेली होती असे सांगण्यात येत आहे. दिल्लीवरून घरी आल्यानंतर त्या मुलीला घरीच वेगळ्या रूममध्ये क्वारंटाईन ठेवण्यात आले होते. पण मुलीच्या वडिलांनी स्थानिक प्रशासनापासून ही माहिती लपवून ठेवली. त्यांनी मुलीला घरीच ठेवले. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, पोलिस विभाग अथवा वेकोलि प्रशासनाला त्यांनी याबाबत अवगत केले नाही. यानंतर अचानक गत शुक्रवारी मुलीची तब्येत बिघडली असता तिला वलनीतील वेकोलिच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांना तिची लक्षणे संशयित वाटताच लागलीच तिला रुग्णवाहिकेने नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमध्ये रवाना केले. दरम्यान, शनिवारी तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. ही माहिती मिळताच वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी बी-टाईप वसाहतीत जाऊन पाहणी केली. एकीकडे स्थानिक प्रशासनाने या विषयाबाबत वेकोलिविरोधात नाराजी व्यक्त केली होती. याचा परिणाम म्हणून वेकोलिच्या महाव्यवस्थापकांनी मुलीच्या वडिलांना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्याचा निर्णय घेतला. सदर कोरोनाबाधित युवतीमुळे वेकोलि वसाहतीतील राहणाऱ्या तिच्या संपर्कात आलेल्या व वेकोलि रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे.