‘न्यूसेन्स डिटेक्शन स्क्वॉड’ निर्माण करणार : वसुलीच्या तक्रारीमुळे योजना बंद राजीव सिंग। लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, अस्वच्छता निर्माण करणे व अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी ‘न्यूसेन्स डिटेक्शन स्क्वॉड’ निर्माण केले जाणार आहे. याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परंतु महापालिकेत एक दशकाहून अधिक कालावधीत नागरी पोलीस कार्यरत होते. तेही हेच काम करीत होते. परंतु त्यांच्याकडून वसुलीच्या तक्रारी आल्याने ही सेवा बंद करावी लागली. त्यामुळे नागरी पोलिसांची संकल्पना नागपुरात नापास ठरलेली आहे. तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी नागरी पोलिसांची नियुक्ती केली होती. प्रत्येक प्रभागात एक नागरी पोलीस नियुक्त करण्यात आला होता. सन २००० मध्ये नागरी पोलिसांनी सेवा देण्याला सुरुवात केली होती. अस्वच्छता निर्माण करणे, उघड्यावर कचरा टाकणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंड आकारण्याचे काम नागरी पोलीस करीत होते. सुरुवातीला त्यांच्याकडून लहानसहान घटनात कारवाई केली जात होती. नंतर त्यांना अधिकार देण्यात आले. त्यानुसार दोषीकडून दंड वसूल करीत होते. नागरी पोलिसांच्या माध्यमातून महापालिकेला वर्षाला एक ते दीड कोटीचे उत्पन्न मिळत होते. सुरुवातील ४५ नागरी पोलिसांची भरती करण्यात आली होती. त्यानंतर प्रभागानुसार त्यांची संख्या वाढविण्यात आली होती. त्यांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिले जात होते. २०११-१२ मध्ये नागरी पोलिसांकडून वसुली केली जात असल्याच्या तक्रारी आल्या. तक्रारी वाढल्याने नागरी पोलीस सेवा बंद करण्यात आली. तत्कालीन आयुक्त श्याम वर्धने यांच्या कार्यकाळात हा निर्णय घेण्यात आला होता. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करणे, उघड्यावर कचरा टाकणे व अतिक्रमणाला आळा घालण्याचे झोन स्तरावरील सहायक आयुक्तांंना निर्देश देण्यात आले होते. आयुक्त अश्विन मुदगल यांनी पदभार स्वीकारताच उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सोबतच न्यूसेन्स डिटेक्शन स्क्वॉड बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सेवानिवृत्त सैनिकांना ठेवण्याची योजना न्यूसेन्स डिटेक्शन स्क्वॉडमध्ये सेवानिवृत्त सैनिकांना ठेवण्यात येणार आहे. हे स्क्वॉड झोन स्तरावर काम करणार आहे. यात एक पथक प्रमुख,चार सहायक व एक चालक राहणार आहे. या पथकावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष कार्य अधिकाऱ्याची नियुक्ती के ली जाणार आहे. लोकांना शिस्त लागावी. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वसुलीच्या तक्रारी येऊ नये यासाठी ई -गव्हर्नस यंत्रणेच्या माध्यमातून दंड वसूल केला जाणार आहे. यासाठी पथकाला इलेक्ट्रॉनिक मशीन उपलब्ध करण्यात येतील. नागरी पोलिसांच्या धर्तीवर नियुक्तीनागरी पोलिसांच्या धर्तीवर न्यूसेन्स डिटेक्शन स्क्वॉड गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात माजी सैनिकांना ठेवण्यात येईल. या पथकाला अधिकार देण्यात येतील. महापालिका सभागृहाच्या मंजुरीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल.- डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी,महापालिका
नागरी पोलिसांची संकल्पना नापास
By admin | Published: June 20, 2017 1:54 AM