- नितीन गडकरी : सहकारतज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांचा सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आत्मनिर्भर भारताचा मार्ग सहकार चळवळीतूनच जातो आणि ग्रामीण भागाच्या विकासात सहकार चळवळीचे महत्त्वाचे योगदान असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्या वतीने शंकरनगर येथील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात शनिवारी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल सहकारतज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांचा सत्कार गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शासनाच्या सहकार क्षेत्रातील प्रधान सचिव अनुप कुमार होते, तर व्यासपीठावर प्रतिष्ठानचे गिरीश गांधी, संजय भेंडे, कैलाश अग्रवाल, रवींद्र दुरुगकर उपस्थित होते.
सहकार क्षेत्राच्या कार्यपद्धतीत गुणात्मक सुधारणा अपेक्षित आहे. लोककल्याणकारी राज्यात गरिबांना लाभ होईल, या अनुषंगाने सहकार क्षेत्राचे गठन झालेले आहे. सहकार चळवळीत पीपीपी, को-ऑप. शेअर होल्डर यांनी समाजाची सेवा होईल व व्यावसायिक दृष्टिकोनही जपला जाईल, असा सुवर्णमध्य साधण्याचे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. अनेक बँका चांगल्या संचालकांमुळे टिकल्या. मात्र, कोणतीही बँक संचालकांची नसून लोकांची आहे. यश-अपयश हे लागूनच आलेले आहे. अडचणीत असलेल्या संस्थांना बाहेर काढणे गरजेचे आहे तरच ही चळवळ आणखी शक्तिशाली होईल, असे गडकरी यावेळी म्हणाले.
.............