निशांत वानखेडे/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १९७५ च्या दरम्यान जेव्हा वेगवेगळ्या समाज प्रवाहाच्या चळवळी उदयास आल्या त्यावेळी स्त्री स्वातंत्र्याचा विचारही मूळ धरू लागला होता. संविधानाची प्रेरणा आणि पाश्चात्त्य देशात चाललेल्या हालचालींनी भारतीय स्त्रियांच्या भावनांना जाग येत होती. समानतेची वागणूक, शैक्षणिक-बौद्धिक प्रगती व कर्तृत्व सिद्ध करण्याची मोकळीक, विचार आणि निर्णयस्वातंत्र्य हा त्या चळवळीचा केंद्रबिंदू होता. मात्र ९० नंतरच्या काळात धार्मिक अवडंबराने पुन्हा डोके वर काढले. एकीकडे जागतिकीकरणाने स्वातंत्र्याला चंगळवादाचे रूप दिले तर दुसरीकडे स्त्रियांना धर्माच्या नव्या वेशात गुंतविले गेले. टीव्हीवरील मालिकांनी तर कालबाह्य रुढीपरंपरांना फॅशनचेच रूप दिले. आतातर विचार व निर्णय स्वातंत्र्याचा बिंदूच मागे पडला असून स्त्री स्वातंत्र्याची संकल्पनाच भरकटत गेली, हे परखड मत व्यक्त केले प्रसिद्ध लेखिका उर्मिला पवार यांनी.दुसऱ्या आंबेडकरी महिलासाहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून नागपूरला आलेल्या उर्मिला पवार यांनी लोकमतशी संवाद साधला. ‘आयदान’ या कादंबरीमुळे प्रकाशात आलेल्या उर्मिला यांनी ५० वर्षातील स्त्रीमुक्ती चळवळीची स्थिती विषद केली. देशात स्त्रीमुक्ती चळवळ सुरू असताना या चर्चांमध्ये दलित स्त्रियांच्या दु:खांना, समस्यांना स्थान नसल्याचे जाणवायला लागले होते. त्यामुळे या चळवळीने भ्रमनिरास झाला होता. धर्मांतरानंतर आंबेडकरी समाजाची ईश्वरीय भीती नाहिशी झाली होती व हा समाज प्रगतीसाठी धडपडायला लागला होता. यात स्त्रियांमध्येही जाणीव निर्माण केली होती, ज्यामधून अनेक स्त्रिया साहित्यातून पुढे आल्याचे त्यांनी सांगितले. रथयात्रा आणि बाबरी विध्वंसानंतर स्त्रीमुक्तीची चळवळच विस्कळीत झाली. समाजाचे दोन गट पडले. एक परंपरांना महत्त्व देत जातीयतेला पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न करणारा गट. स्त्रियांना यात गुंतविल्याशिवाय त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नव्हतेच, त्यामुळे पुन्हा हे जोखड स्त्रियांवर लादण्यात आले. या बदलात शैक्षणिक-बौद्धिक प्रगती व विचारस्वातंत्र्याला महत्त्व देणारा गट मागे पडत गेला. जागतिकीकरणाने चंगळवादाचे नवे रूप निर्माण केले आणि पुढे स्त्रीमुक्तीची संकल्पनाच भरकटत गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या विस्क ळीतपणाचा फायदाच धर्मवादी लोक घेत आहेत. जातीला महत्त्व आले असून जातीच खुलेआम बोलत आहेत. जातीचा झेंडा घेउन आंदोलने-संमेलने होत आहेत. विदेशात राहणाऱ्या भारतीयांनाही जातीयतेमध्ये गुरफटल्या जात असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. चंद्रावर, मंगळावर माणूस म्हणून जाणार की जातीचा झेंडा घेऊन, असा सवाल त्यांनी केला.नयनतारा सहगल व अ.भा. मराठी साहित्य संमेलनाबाबत त्या म्हणाल्या, एका स्वतंत्र विचाराच्या स्त्री लेखिकेला विचार मांडण्याच्या व्यासपीठावर बोलू दिले जात नाही, ही सहिष्णुता नव्हे तर दडपशाहीचे दुसरे रूप होय. ही दडपशाही आज सर्वत्र सुरू आहे. देशातील विद्यापीठे, विविध संस्थामध्ये या दडपशाहीच्या विरोधात आक्रोश आहे. मात्र तो व्यक्त करण्याबाबत भीती निर्माण झाली आहे. बोलले तर दाभोळकर-पानसरे होईल, शहरी नक्षलवादी ठरविले जाईल, लक्ष्य केले जाईल किं वा नोकरीबाबत काही समस्या निर्माण केल्या जातील, या भीतीने बोलण्यास कुणी धजावत नाही. दहशतीत ठेवले की मोकळेपणाने बोलता येत नाही. लोकांनी श्रद्धा ठेवून अंधश्रद्धेतच राहिले पाहिजे, विचारच करता कामा नये, त्यांची बुद्धीच बंद व्हावी, अशी व्यवस्था निर्माण केली जात आहे. विचार पेरला की डोके ठेचायचे अशी झुंडशाही निर्माण करण्यात आली आहे. दलित समाज गुलाम म्हणून राहिला तर ठीक, मात्र प्रगती करून बरोबरीत आला की मान्य होत नाही. मग त्याचे हातपाय तोडायचे, असे भीतीदायक वातावरण निर्माण करण्यात आल्याची टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी ‘आयदान’ आणि त्यांच्या इतर साहित्याबाबत माहिती दिली.युद्धापेक्षा संवाद अधिक महत्त्वाचादहशतवाद संपविणे आवश्यक आहे, पण युद्ध हाच एकमेव पर्याय नाही. युद्धात त्यांची माणसे मरतात तशी आपलीही माणसे मारली जातात. शेवटी मरतो तो माणूसच. मानवतेच्या दृष्टीनेही विचार होणे गरजेचे आहे. युद्धापेक्षा सलोख्याने, समन्वयाने समस्या सुटणे अधिक चांगले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
स्त्री स्वातंत्र्याची संकल्पनाच भरकटली आहे : उर्मिला पवार यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 11:51 PM
१९७५ च्या दरम्यान जेव्हा वेगवेगळ्या समाज प्रवाहाच्या चळवळी उदयास आल्या त्यावेळी स्त्री स्वातंत्र्याचा विचारही मूळ धरू लागला होता. संविधानाची प्रेरणा आणि पाश्चात्त्य देशात चाललेल्या हालचालींनी भारतीय स्त्रियांच्या भावनांना जाग येत होती. समानतेची वागणूक, शैक्षणिक-बौद्धिक प्रगती व कर्तृत्व सिद्ध करण्याची मोकळीक, विचार आणि निर्णयस्वातंत्र्य हा त्या चळवळीचा केंद्रबिंदू होता. मात्र ९० नंतरच्या काळात धार्मिक अवडंबराने पुन्हा डोके वर काढले. एकीकडे जागतिकीकरणाने स्वातंत्र्याला चंगळवादाचे रूप दिले तर दुसरीकडे स्त्रियांना धर्माच्या नव्या वेशात गुंतविले गेले. टीव्हीवरील मालिकांनी तर कालबाह्य रुढीपरंपरांना फॅशनचेच रूप दिले. आतातर विचार व निर्णय स्वातंत्र्याचा बिंदूच मागे पडला असून स्त्री स्वातंत्र्याची संकल्पनाच भरकटत गेली, हे परखड मत व्यक्त केले प्रसिद्ध लेखिका उर्मिला पवार यांनी.
ठळक मुद्देदहशतीमुळे मोकळेपणाने बोलता येत नाही