नागपूर : कोरोनाच्या संक्रमणातही दहावी, बारावी परीक्षेच्या आयोजनाचे मोठे आव्हान बोर्डापुढे आहे. बोर्डाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षेचे केलेल्या नियोजनामुळे परीक्षा सुरळीत पार पडतील, असा विश्वास बोर्डाला आहे. पण यंदा बोर्डाला व्हॅल्यूअरची चिंता भेडसावत आहे. शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या निवृत्तीमुळे व्हॅल्यूअर मिळणे अवघड असल्याचे बोलले जात आहे.
बोर्डाच्या परीक्षेनंतर निकाल वेळेत लागावा म्हणून बोर्ड प्रत्येक शाळा व ज्युनिअर कॉलेजमधून व्हॅल्यूअरसाठी विषय शिक्षकांची यादी मागते. पण यंदा मोठ्या संख्येत शिक्षकांच्या सेवानिवृत्तीमुळे बोर्डापुढे व्हॅल्यूअर मिळणे काहीसे अवघड झाले आहे. स्वयंअर्थसहायित शाळा व कॉलेजमध्ये कोरोनामुळे वर्गच झाले नाही. त्यामुळे या शाळा व्यवस्थापनाने अनेक शिक्षकांना घरी बसविले आहे. विना अनुदानित शाळांना २० टक्के अनुदानाची आशा शासनाने दाखविली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येत असणारा हा शिक्षकवर्ग यंदा तपासणीचे काम करू शकतो. पण त्यातही बऱ्याच शाळांच्या त्रुटीचा विषय निवळलेला नाही. त्यामुळे नाराजीचाही एक सूर आहे. जे अनुदानित शाळांचे शिक्षक आहेत, त्यांच्यासाठी पेपर तपासणीचे कामे डोईजडच असते. दरवर्षी शासकीय व अनुदानित शाळेतील शिक्षकांचा बोर्डाच्या कामासाठी प्रतिसादही कमीच असतो. बोर्डाच्या कामाच्या मानधनाचाही विषय नेहमीचाच आहे. त्याचाही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनाची चिंता बोर्डाला आहे.
- तीन तासाच्या पेपरचे सहा रुपये व दोन तासाच्या पेपरचे चार रुपये बोर्डाकडून मिळतात. हे मानधन फार अत्यल्प आहे. एक पेपर तपासायला किमान अर्धा तास लागतो. मानधनात वाढ करावी, अशी मागणी अनेक वर्षापासून आहे. एवढ्या अत्यल्प मानधानात कसे काम करणार.
सचिन भोपे, समन्वयक, शिक्षक समन्वय संघ
- मानधनाचा प्रश्न हा राज्य मंडळाच्या अखत्यारितील आहे. हे परीक्षेचे काम आहे. प्रत्येक शिक्षकाला ते बंधनकारक आहे. कृपया शिक्षकांनी कामातून माघार घेण्यासाठी मंडळाकडे विनंती अर्ज करू नये.
माधुरी सावरकर, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ नागपूर