लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काश्मिरी विस्थापित तसेच काश्मिरी पंडितांच्या मुला-मुलींना प्रवेशप्रक्रियेदरम्यान शैक्षणिक सवलत देण्याचा निर्णय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने घेतला आहे. केंद्र सरकारच्या निर्देशांनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. विद्वत परिषदेच्या मान्यतेनंतर हा निर्णय घेण्यात आला असून विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी यासंदर्भात पत्रदेखील जारी केले आहे.
यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या ‘कटऑफ’मध्ये कमाल १० टक्क्यांची शिथिलता देण्यात येईल. याशिवाय अभ्यासक्रमनिहाय प्रवेशक्षमता ५ टक्क्यांनी वाढविण्यात येईल. सोबतच तांत्रिक व व्यावसायिक संस्थांमध्ये मेरिट कोट्यामध्ये या मुलांसाठी एक जागा आरक्षित करण्यात येणार आहे. काश्मिरी विस्थापितांना अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आली आहे. परंतु काश्मिरी पंडितांच्या मुलांसाठी ही अट लागू असेल.