जन्म प्रमाणपत्रावर एप्रिल २०२६ पर्यंत नाव नोंदणीची सवलत
राजीव सिंह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महत्वाच्या दस्तावेजासाठी जन्मप्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु नाव नोंदणी करताना येणाऱ्या अडचणींचा विचार करता राज्य सरकारने २७ एप्रिल २०२६ पर्यंत १५ वर्षाहून अधिक वयाच्या नागरिकांना नाव नोंदणीसाठी पुन्हा सवलत दिली आहे. परंतु या आदेशाबाबत मनपा प्रशासन अजूनही अनभिज्ञ आहे.
या संदर्भात राज्याचे आरोग्य उपसंचालक व उपमुख्य निबंधक, जन्म -मृत्यू डॉ. जी.एम. गायकवाड यांनी मे २०२१ मध्ये आदेश जारी केले आहे. परंतु मनपा प्रशासनाला या आदेशाबाबत अजूनही कल्पना नाही. या संदर्भात संबंधित विभागाकडून मनपाला कोणत्याही स्वरुपाचे अधिकृत पत्र व ई-मेल प्राप्त झाला नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ च्या कलम १४ व महाराष्ट्र जन्म व मृत्यू नोंदणी नियम २००० नुसार जन्मापासून १५ वर्षापर्यंत नाव नोंदणी करता येते. त्यानंतर नाव नोंदणी करण्याची सुविधा नाही. राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात लोकांची नाव नोंदणी झालेली नसल्याने नाव नोंदणीला तीन वेळा मुदतवाढ दिली. त्यानंतरही जन्माची नोंद प्रमाणपत्रावर नसलेल्यांची संख्या मोठी आहे. याचा विचार करता राज्य सरकारने एप्रिल २०२६ पर्यत नाव नोंदविण्याला मुदतवाढ दिली आहे.
या अधिसूचनेनुसार मोठ्या संख्येने नागरिक मनपात जन्म -मृत्यू प्रमाणपत्र विभागात येत आहेत. परंतु त्यांना परत पाठविले जात आहे. महिनाभरापासून ही समस्या आहे. संबंधित विभागाच्या उपायुक्त रंजना लाडे यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या. मात्र यावर कोणताही निर्णय घेतला नाही.
..
तीनदा मिळाली सवलत
राज्य सरकारने यापूर्वी जन्म प्रमाणपत्रात नाव नोंदविण्यासाठी तीनदा सवलत दिली. सर्व प्रथम २६ ऑक्टोबर २००५ ते २५ ऑक्टोबर २००७, दुसऱ्यांदा १ जानेवारी २०१३ ते १३ डिसेंबर २०१४ व १५ मे २०१५ ते १४ मे २०२० पर्यंंत सवलत दिली होती. पुन्हा पाच वर्षे सवलत मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
...........
माहिती मिळाली पण आदेश नाही -लाडे
जन्म प्रमाणपत्रावर नाव नोंदणीला मुदतवाढ मिळाल्याची माहिती दुसऱ्या माध्यमातून मिळाली. परंतु या संदर्भात मनपाला कोणत्याही स्वरुपाचे लिखित आदेश मिळालेले नाही. अशी माहिती मनपाच्या उपायुक्त रंजना लाडे यांनी दिली. आदेशासंदर्भात संबंधित विभागाला पत्र लिहिले आहे. यावर उत्तर मिळताच त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
..........
अशी आहे नाव नोंदणीची प्रक्रिया
-जन्म प्रमाणपत्रावर नाव नोंदणीसाठी संबंधित व्यक्तीला विभागाकडे अर्ज करावा लागेल.
-दोन सरकारी दस्तावेज जोडावे लागतील. यात शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्र, पॅन कार्ड, मतदार ओळख पत्र, ड्रायव्हींग लायसन्स, सरकारी कार्यालयात कर्मचारी असल्यास ओळख पत्र
-ज्याचे नाव नोंदवायचे आहे त्याचे पूर्ण नाव लिहावे लागेल.
- प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जन्म प्रमाणपत्र विभाग कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करेल. त्यानंतर जन्म प्रमाणपत्रावर नाव नोंदविले जाईल.
-काही तांत्रिक अडचण आल्यास विभागातर्फे अर्जधारकाला कळविले जाईल.