लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाचे काटोलचे आमदार आशिष देशमुख हे आपल्या वादग्रस्त वक्तव्य व कृत्याने भाजपाला नेहमीच अडचणीत आणत असतात. रविवारीसुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित खरीप आढावा बैठकीत ते सायकलने आले आणि पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध करीत सरकारला घरचा अहेर दिला.रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सकाळी खरीप आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्याचे सर्व आमदार, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत सहभागी होण्यासाठी काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्राचे भाजपाचे आमदार आशिष देशमुख हे चक्क चारचाकी गाडी सोडून सायकलने दाखल झाले. तेव्हा उपस्थित पत्रकारांनी त्यांना सायकलवर येण्याचे कारण विचारले तेव्हा आ. देशमुख यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे कारण सांगितले.केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवर वाढवलेली एक्साईज ड्युटी व व्हॅटमुळे महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेसोबतच मध्यम व उच्चवर्गीय लोकांचे सुद्धा कंबरडे मोडल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच एक्साईज व व्हॅट ड्युटी तात्काळ रद्द केल्यास पेट्रोल-डिझेलच्या किमती नियंत्रणात आणाव्यात, अशी मागणी केली. यासोबतच राज्यभर गाजत असलेला कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प विदर्भात स्थलांतरीत करण्याची मागणी केली. याबाबत आपण अगोदरच मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी केल्याचे सांगितले. या प्रकल्पामुळे विदर्भातील जनतेला पेट्रोल-डिझेल कमी भावात मिळेल, असेही सांगितले.
पेट्रोल दरवाढीचा निषेध; आशिष देशमुख सायकलवर आले मिटिंगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 9:50 AM
भाजपाचे काटोलचे आमदार आशिष देशमुख रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित खरीप आढावा बैठकीत ते सायकलने आले आणि पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध करीत सरकारला घरचा अहेर दिला.
ठळक मुद्देसरकारला दिला घरचा अहेर