नागपूर : कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सरकारने लावलेल्या लॉकडाऊनमुळे ० ते ५ वयोगटातील बालकांचे योग्य पोषण होऊ शकले नसल्याचे मार्च महिन्याच्या आकडेवारीवरून पुढे आले आहे. बालकांची ही आकडेवारी प्रशासनाची चिंता वाढविणारी आहे. महिला व बाल कल्याण विभागाने मार्च २०२१मध्ये नोंदविलेल्या आकडेवारीनुसार नागपूर जिल्ह्यातील कमी वजन असलेल्या बालकांची संख्या ८७४३ आहे. तीव्र कमी वजन असलेल्या बालकांची संख्या १२०४ आहे. मध्यम तीव्र कुपोषित बालके ४९४ असून, अति तीव्र कुपोषित ९९ बालके आहेत. अंगणवाड्यांमध्ये बालकांच्या वजनानुसार घेणाऱ्या या चारही नोंदी बालकांना कुपोषणाच्या छायेत असल्याचे दर्शवितात.
मार्च २०२० मध्ये कोरोनाने नागपूर जिल्ह्यात पाऊल ठेवले. तेव्हापासून जिल्ह्यातील अंगणवाड्या बंद आहेत. अंगणवाड्यांमध्ये पूर्ण प्राथमिक शिक्षणाबरोबरच बालकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. बालकांना पूरक पोषण आहार पुरविला जातो. परंतु अंगणवाड्या बंद असल्याने तीन महिन्यातून पोषण आहार बालकांच्या घरोघरी पोहोचविला जात आहे. प्रशासन म्हणते की, आम्ही नियमित बालकांना पोषण आहार पुरवितो. पण, बालकांच्या वजनाची आकडेवारी लक्षात घेता, खरे पोषण बालकांचे होते, की कुटुंबातील सदस्यांचे, हा संशोधनाचा विषय आहे.
एकात्मिक बाल विकास योजनेच्या माध्यमातून त्यांचे कुपोषण दूर करण्यासाठी विविध उपाययोजना करुन कुपोषित मुलांना पोषण आहार दिला जातो. जिल्ह्यात २४२५ अंगणवाड्या कार्यरत आहेत. यात १ लाख ३९ हजारांवर ३४८ बालकांचे पूर्व प्राथमिक शिक्षणाबरोबरच त्यांचे पोषण केले जाते. मार्च महिन्यात १,३८,७४५ बालकांचे वजन मोजण्यात आले. त्यातून ही माहिती पुढे आली.
कोरोनामुळे जिल्ह्यात मार्च महिन्यापासून अंगणवाड्या बंद करण्यात आल्या. पण, बालकांना पोषण आहाराच्या रुपात कडधान्य त्यांच्या घरी जाऊन पुरविले जात आहे. कोरोनामुळे अंगणवाडीत पूर्व प्राथमिक शिक्षण बंद असले तरी, मुलांचे वजन, सीबीई कार्यक्रम व पोषण आहाराचे वितरण सुरू आहे. कडधान्याच्या रुपात चणाडाळ, मसूर डाळ, तिखट, हळद, तेल, गहू आदींचा समावेश आहे. पूर्वी अंगणवाडीत शिजलेला आहार येत होता. आता अंगणवाडी बंद असल्याने कडधान्य येत आहे.
- प्रशासन म्हणते
या बालकांना ग्राम बालविकास केंद्राच्या माध्यमातून एनर्जी डेन्स न्यूट्रेशन फुड (ईडीएनएफ) आहार देऊन त्यांचे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
- तालुकानिहाय स्थिती
तालुका कमी वजन तीव्र कमी वजन मध्यम तीव्र कुपोषित अति तीव्र कुपोषित
रामटेक ६०७ ८७ ५८ ७
काटोल ४५७ ५५ २५ ८
कळमेश्वर ५०३ ६९ ३५ ७
सावनेर ८०५ ९५ ५५ ५
भिवापूर ३६० ७२ २७ ३
पारशिवनी ८१९ ११३ २३ ६
नरखेड ३२१ ३५ १९ २
कुही ६०२ ६० १८ ८
उमरेड ६२६ ११९ २८ १२
हिंगणा १००७ १८३ ५९ २१
नागपूर १३४९ १५५ ५६ ५
मौदा ७२७ ८६ २१ ९
कामठी ५६० ७५ ७० ६