ब्रिजेश तिवारी
कोंढाळी : कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराने कोंढाळी व ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फटका बसत आहे. काटोल तालुक्यातील २० हजार लोकसंखेच्या कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज कोंढाळी व ग्रामीण भागातील मोठ्या संखेत रुग्ण उपचाराला येतात. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र राष्ट्रीय महामार्गावर असल्याने अपघातात जखमीही उपचाराला येतात. याबाबी विचारात घेत शासनाने कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा दिला. त्याचे बांधकाम सुरू आहे. तसेच कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात सातही दिवस चोवीस तास आरोग्य सेवा सुरू केली आहे, पण गत सहा महिन्यांपासून कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाह्यरुग्ण विभागाची वेळ सकाळी ८.३० ते दुपारी १२.३०पर्यंतची असताना सकाळी १०.२० ते ११ वाजेपर्यंत डॉक्टर व कर्मचारी येत नाहीत. ग्रामीण भागातील रुग्ण त्यांची वाट पाहत बसलेले असतात. तसेच अपघातातील जखमींनाही वेळेवर तातडीने उपचार मिळत नाही. ग्रामीण भागातून अनेक रुग्ण रात्री बेरात्री उपचाराल येतात. त्यांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात येतो. रुग्णांच्या तक्रारीवरून लोकमत चमूने शनिवारी (दि. ६ रोजी) कोंढाळी आरोग्य केंद्राची पाहणी केली असताना सकाळी १०.३० वाजताही प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोरे व औषधी वितरण करणारे केमिस्ट व कर्मचारी हजर नव्हते. आरोग्य केंद्राबाहेर रुग्ण त्यांच्या प्रतीक्षेत दिसून आले. ही एक दिवसाची नव्हे तर दररोजची या आरोग्य केंद्रातील स्थिती असल्याची माहिती येथील उपस्थित रुग्णांनी दिली. अशावेळी ग्रामीण भागातील नागरिकांनी येथे चांगल्या आरोग्य सुविधांची अपेक्षा येथे का करावी, हाही एक प्रश्न आहे.
ग्रामीण रुग्णालयाचे काम ढेपाळले
कोंढाळी ग्रामीण रुग्णालयाचे काम निधीअभावी गत सहा वर्षांपासून रेंगाळले आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातून किमान चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात याकडे नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने लक्ष द्यावे, अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
जि. प. सदस्याची तक्रार
कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबत लोकांच्या अनेक तक्रारी आहेत. या तक्रारीची दखल घेत कोंढाळी येथील जिल्हा परिषद सदस्या पुष्पा चाफले व ग्रा.पं. सदस्य प्रमोद चाफले यांनी वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्यरुग्ण उपचाराची वेळ सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० तसेच सायंकाळी ४ ते ७ अशी असल्याचे सांगण्यात आले. यावेळी हजर न राहणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्याना कारणे दाखवा नोटीस बजाविणार असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना दिली.