नागपूर : राज्यभर गाजलेल्या क्रीडा घोटाळ्यातील आरोपी उपशिक्षणाधिकारी रवींद्र सावंतला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. सावंतवर बोगस क्रीडा प्रमाणपत्र तयार करणे व त्या आधारावर नोकरी मिळविणे, हे आरोप आहेत.
या प्रकरणात एकूण १९ आरोपी असून, त्यांच्याविरुद्ध मानकापूर पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत. सावंतने पॉवरलिफ्टिंगचे बोगस प्रमाणपत्र मिळवून २०१७ मध्ये क्रीडा कोट्यातील उपशिक्षणाधिकाऱ्याची नोकरी प्राप्त केली. त्याने स्वत:साठी हा गैरप्रकार केलाच, इतरांनाही त्याकरिता प्रोत्साहन दिले. त्यामध्ये त्याच्या सख्ख्या भावाचा समावेश आहे. पोलिसांना तपासादरम्यान सावंतच्या घरात सर्व बोगस कागदपत्रे मिळून आली. या घोटाळ्यात क्रीडा अधिकारी व पॉवरलिफ्टिंग महासंघाचे पदाधिकारीही सामील आहेत. आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सावंततर्फे ॲड. नीतेश समुंद्रे यांनी कामकाज पाहिले.