नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने गुरुवारी जिल्हा जल संधारण अधिकारी रमेशकुमार गुप्ता यांना लाच प्रकरणामध्ये सशर्त जामीन मंजूर केला. न्या. एम. एस. आझमी यांनी हा निर्णय दिला.
गुप्ता यांच्याविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ७५ हजार रुपयाची लाच स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सरकारी कंत्राटदार मो. युनुस पटेल यांनी रामटेक तालुक्यातील सालई येथील नाल्याचे काम पूर्ण केल्यानंतर गुप्ता यांना अंतिम बिल सादर केले होते. गुप्ता यांनी ते बिल मंजूर करण्यासाठी ७५ हजार रुपयाची लाच मागितली. पटेल यांना ही रक्कम द्यायची नव्हती. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून उदयनगर येथे सापळा रचण्यात आला व गुप्ता यांना ७५ हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले, अशी पोलीस तक्रार आहे. गुप्तातर्फे ॲड. प्रशांत सत्यनाथन व ॲड. उज्ज्वल फसाटे यांनी कामकाज पाहिले.