वाडी : व्याहाड पेठ येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात काेविड लसीकरण माेहीम सुरू आहे. परंतु व्याहाड पेठ हे लाव्हा, वाडी व खडगावपासून लांब अंतरावर असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना हे प्राथमिक आराेग्य केंद्र गैरसाेईचे ठरत आहे. त्यामुळे लाव्हा ग्रामपंचायत येथे काेविड लसीकरण माेहीम राबविण्यात यावी, अशी मागणी लाव्हा येथील सरपंच ज्याेत्स्ना नितनवरे यांनी व्याहाड पेठ केंद्राच्या आराेग्य अधिकारी डाॅ. प्राजक्ता उराडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लाव्हा ग्रामपंचायत हे लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव असून, व्याहाड पेठ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येते. सध्या शासनाच्या निर्देशानुसार लसीकरणाचे काम केवळ प्राथमिक आरोग्य केंद्रापुरते मर्यादित आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व्याहाड ते लाव्हा गावापासूनचे अंतर लांब असल्यामुळे जेष्ठ नागरिक व इतर व्यक्तींना त्या ठिकाणी जाऊन लस घेणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्र हे लाव्हा येथे असल्यामुळे व ग्रामपंचायत इमारतीमध्ये आवश्यक त्या साेईसुविधा असल्यामुळे तसेच गावकऱ्यांची मागणी लक्षात घेता आठवड्यातील किमान दाेन दिवस ग्रामपंचायत लाव्हा येथे लसीकरण माेहीम राबविण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. लसीकरणासाठी निर्देशित केलेल्या व्यवस्थेबाबत ग्रामपंचायत तयार असल्याचेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. या निवेदनाची प्रत आ. समीर मेघे, नागपूर पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी किरण कोवे, तहसीलदार मोहन टिकले, तालुका आरोग्य अधिकारी यांना दिली आहे. या वेळी सरपंच ज्याेत्स्ना नितनवरे, ग्रामविकास अधिकारी विकास लाडे उपस्थित होते.