नागपूर : नागपूर शहराला वायु प्रदुषणपासून मुक्त करण्यासाठी शहर पोलीस, महापालिका, नीरी, महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक परिवहन विभाग व नागपूर स्मार्ट सिटी अशा शासकीय विभागांनी एकत्रित मोहीम राबवावी, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
नागपूर शहराच्या वायू गुणवत्ता सुधारणेकरीता मनपातर्फे गुरुवारी आयुक्त सभाकक्षात बैठक घेण्यात आली. यावेळी उद्यान परिवहन व्यवस्थापक रविन्द्र भेलावे, कार्यकारी अभियंता (पर्यावरण विभाग) श्वेता बॅनर्जी, प्रदुषण नियत्रण मंडळाचे अधिकारी अशोक कारे व हेमा देशपांडे, नीरीच्या डॉ.पदमा राव, संगिता गोयल, डॉ. लाल सिंग, के.पी.पुसदकर, स्मार्ट सिटीच्या डॉ. प्रणिता उमरेडकर, आर.टी.ओ.चे मार्तंड नेवसकर आणि मनपाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तात्काळ करण्यायोग्य व अल्पमुदतीचे काम करून नागरिकांना वायु प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शहर पोलीस व आर.टी.ओ यांनी जुन्या वाहनांच्या प्रदूषण प्रमाणपत्राची तपासणी मोहीम सुरू करावी. वायु प्रदूषण कमी करण्यासाठी नीरी, प्रदूषण नियंत्रण मंडळ सोबत अल्पकालीन आणि तातडीच्या उपाययोजना करण्यावर भर द्यावा अशी सूचना आयुक्तांनी केली.
वाहनांमुळे बर्डी, धंतोली, कॉटन मार्केट, सोमलवाडा, गांधीबाग, इंदोरा, जरीपटका, महाल, घाट रोड, वर्धमाननगर, पारडी येथे प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. सर्वात जास्त प्रदूषण बस, ट्रक, चारचाकी वाहन, कार, जीप आशा मोठ्या वाहनांमुळे आणि दुचाकी वाहनांमुळे होत आहे. यासाठी अशा वाहनांची वारंवार तपासणी करण्याची आवश्यकता आहे. यासोबतच बांधकामामुळे आणि दहन घाटांमुळेसुध्दा हवेत प्रदूषण होत असल्याचे बी. पदमा एस. राव यांनी सांगितले.
लालसिंग म्हणाले, हवेत होणाऱ्या प्रदूषणाला रोखण्यासाठी विशिष्ट वृक्ष लावले तर याच्यावर नियंत्रण आणू शकतो. नीरीने नागपूर शहराचा प्रारूप वायु प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे. त्रिसदस्यीय समितीच्या शिफारशीनुसार कृती आराखड्यास मंजुरी प्राप्त झाली असून राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत सहा प्रकल्पांसाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी पाच प्रकल्प नागपूर महानगरपालिका राबविणार असून त्यासाठी ५.८५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यासोबतच १५ व्या वित्त आयोग अनुदानांतर्गत ६६ कोटींचे अनुदान प्राप्त झाले असून यापैकी ३३ कोटीचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहे.
....
सहा प्रकल्प मंजूर
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत जे सहा प्रकल्प मंजूर करण्यात आले आहे त्यामध्ये तीन ठिकाणी हवा गुणवत्ता तपासणी संयंत्र, वाहतूक मार्गिकेत हरित क्षेत्र, शहरातील उद्यानात बागायती पालापाचोळ्याची विल्हेवाट लावणे (लता मंगेशकर उद्यान, दयानंद पार्क), शहरातील वायू प्रदूषणाबाबत जनजागृती व क्षमता बांधणी कार्यक्रम, यांत्रिक रस्ते सफाई करिता यंत्रचलित दोन वाहने आणि तीन वॉटर स्प्रिंकलर यांचा समावेश आहे.
....
१३ कलमी कार्यक्रम
१५ व्या वित्त आयोगांतर्गत मिळणाऱ्या अनुदानातून १३ कलमी कार्यक्रम तयार केला आहे. यात यांत्रिकी पद्धतीने रस्त्यांची नियमित स्वच्छता करणे, उद्यान, सार्वजनिक ठिकाणे, हाऊसिंग सोसायटी, शाळा आदी ठिकाणी हरित क्षेत्राची निर्मिती, वाहतूक स्थळे, रस्ते दुभाजक, वाहतूक जंक्शन या ठिकाणी झाडे लावणे, वाहतूक जंक्शन आणि सिग्नल्सचा विकास,, जयताळा येथे ग्रीन क्रिमटोरिया, तेथे हरित क्षेत्र निर्माण करणे, पाच उद्यानांचा विकास, क्रिमटोरियासाठी हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा उभारणे, सुकर वाहतुकीसाठी खड्डेविरहित रस्ते ठेवणे, बायोडायव्हर्सिटी पार्क, टेकडीवर वृक्षारोपण आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.