आशिष दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. अद्यापपर्यंत यासंबंधाची अधिकृत माहिती विभागीय मंडळ कार्यालयांना मिळालेली नाही. मात्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी ‘लोकमत’शी चर्चेत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘कोरोना’चा संसर्ग लक्षात घेता सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेण्यात येईल व ‘कोरोना’च्या नियमावलीचे पालन करुनच परीक्षांचे आयोजन होईल, असे त्यांनी सांगितले.
‘कोरोना’ नियमांनुसार परीक्षा केंद्रांमध्ये ‘एक बेंच, एक विद्यार्थी’ योजनेंतर्गत परीक्षार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येईल. एका वर्गखोलीत केवळ २५ विद्यार्थ्यांनाच बसण्याची परवानगी देण्यात येईल. विद्यार्थ्यांना ‘कोरोना’ संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी उत्तर पत्रिका व प्रश्नपत्रिका अगोदरच केंद्रांवर पोहोचविण्यात येतील. शिवाय परीक्षा केंद्रांवर ‘मास्क’ आणि ‘सॅनिटायझर’ अनिवार्य करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.
याअगोदर शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांचे आयोजन केले होते. एकाही विद्यार्थ्याला ‘कोरोना’चा संसर्ग झाला नाही. ही बाब लक्षात घेता परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. मंडळाच्या या निर्णयामुळे यंदा परीक्षा केंद्रांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
‘ऑनलाईन’ होत आहे अभ्यास
‘कोरोना’चा संसर्ग लक्षात मंडळाने परीक्षेचा अभ्यासक्रम कमी केला आहे. शाळांकडून ‘ऑनलाईन’ अध्ययन सुरू आहे. यासोबतच टीव्ही, रेडियो व इतर माध्यमांतून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांत आता प्रत्यक्ष वर्गदेखील होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.