नागपूर : घरगुती नळजोडणीवर टिल्लू पंप लावून पाणी खेचणे हा अपराध आहे. नागपूर महानगर पालिका व आॅरेंज वॉटर प्रा. लि. संयुक्तपणे टिल्लू पंप जप्ती मोहीम संपूर्ण शहरात सुरू करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिका पाणीपट्टी दर मूल्यांकन व वसुली मुख्य उपविधी २००९ मधील तरतुदीनुसार टिल्लू पंप वापरणे बेकायदेशीर आहे. यावर कडक कारवाई म्हणून बुस्टर पंप जप्त केल्या जाईल आणि नळजोडणी स्थगित केली जाईल. टिल्लू पंप जप्ती मोहिमेकरिता मनपाचे झोन प्रतिनिधी आणि ओसीडब्ल्यूचे झोन व्यवस्थापक यांच्या नेतृत्वात एकूण सहा प्रतिनिधी जबाबदार राहतील. विशेष टिल्लू पंप जप्ती पथकाद्वारे आकस्मिक भेटी देऊन तपासणी केली जाईल आणि टिल्लू पंप सापडल्यास वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. जप्त केलेले साहित्य कुठल्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. या पथकाने आपली कारवाई सुरू केलेली असून ३ एप्रिल रोजी साईनाथनगर भागातून २ तर ४ एप्रिल रोजी राहुलनगर व सोमलवाडा भागातून ४ टिल्लू पंप जप्त करण्यात आले आहेत. उन्हाळ्यात नागपूरचे तापमान ४० डिग्रीवर जाते. इतर ऋतूंच्या तुलनेत उन्हाळ्यामध्ये पाण्याचा वापर जास्त प्रमाणात होतो. प्रामुख्याने पिण्यासाठी व कुलरमध्ये पाणी भरण्यासाठी पाण्याचा वापर वाढतो. परिणामी पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. टिल्लू पंपाचा वापर करणे म्हणजे इतरांचे पाणी हिसकावण्यासारखे आहे. यामुळे पाण्याच्या समान वितरणात अडथळा निर्माण होतो. तेव्हा नागरिकांनी टिल्लू पंपाचा वापर करू नये. तसेच इतरांना तसे आढळून आल्यास त्यांनी ओसीडब्ल्यूला कळवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
टिल्लू पंप विरोधात जप्ती मोहीम
By admin | Published: April 05, 2015 2:32 AM