नागपूरसाठी रस्सीखेच, रामटेकसाठी वासनिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:40 AM2018-11-17T00:40:21+5:302018-11-17T00:41:18+5:30
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसने आता सर्वच मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे टिळक भवन मुंबई येथे बैठका घेत आहे. शुक्रवारी विदर्भातील मतदारसंघांवर चर्चा झाली. नागपूरच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा गटबाजी दिसून आली तर रामटेकसाठी मात्र मुकुल वासनिक यांचे एकमात्र नाव समोर आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसने आता सर्वच मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे टिळक भवन मुंबई येथे बैठका घेत आहे. शुक्रवारी विदर्भातील मतदारसंघांवर चर्चा झाली. नागपूरच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा गटबाजी दिसून आली तर रामटेकसाठी मात्र मुकुल वासनिक यांचे एकमात्र नाव समोर आले.
शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अ.भा. काँग्रेस समितीचे सचिव आशिष दुआ, बी संदीप, मणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील,आरिफ नसीम खान आदी उपस्थित होते. नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. काही नेत्यांना आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली. या वेळी नागपूर लोकसभेसाठी विलास मुत्तेमवार, अविनाश पांडे, विकास ठाकरे, प्रफुल्ल गुडधे, डॉ. बबनराव तायवाडे, आशिष देशमुख आदींची नावे समोर आली. विशेष म्हणजे नाना पटोले यांच्या नावाची उघड शिफारस करणे सर्वांनीच टाळले. रामटेकसाठी मात्र मुकुल वासनिक यांचे एकमेव नाव चर्चेत आले. त्यामुळे नागपूरच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.
बैठकीत शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी नागपुरातील काँग्रेसच्या स्थितीवर प्रकाश टाकला. त्यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार व अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव अविनाश पांडे यांचे नाव सुचविले. या दोन नेत्यांच्या बळावरच काँग्रेस नागपुरात भाजपाला टक्कर देऊ शकेल, असा दावा त्यांनी केला. प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री यांनी काँग्रेसने दुसऱ्या फळीतील नेत्यांना संधी देण्याची सूचना करीत विकास ठाकरे यांचे नाव सुचविले. प्रदेश सचिव अभिजित सपकाळ यांनी नगरसेवक प्रफुल्ल गुडधे हे इच्छुक असल्याचे सांगितले. भाजप सोडून काँग्रेसवासी झालेले आशिष देशमुख यांनीही स्वत: लढण्याची इच्छा व्यक्त केली. डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले, विदर्भात ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात असून पक्षाने प्रतिनिधित्व द्यावे. आपले ओबीसी समाजात काम आहे. पक्षाने याची दखल घ्यावी, असे सांगत त्यांनी स्वत:ची दावेदारी सादर केली.
रामटेक लोकसभेच्या चर्चेत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी सर्व पदाधिकाºयांनी एकमताने राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांचे नाव निश्चित केले असल्याचे सांगितले. काँग्रेस नेते नाना गावंडे, सुनीता गावंडे, बाबुराव तिडके, कुंदा राऊत, प्रकाश वसू, आदींनीही वासनिक यांचेच नाव सुचविले. बैठकीला अनंतराव घारड, चंद्रपाल चौकसे, संजय मेश्राम, शकूर नागाणी आदी उपस्थित होते.
तेली समाजाला एक तरी जागा द्या
विदर्भातील तेली समाजाची संख्या लक्षात घेता लोकसभेच्या दहा जागांपैकी किमान एक जागा तेली समाजाला द्यावी, अशी मागणी अॅड. अभिजित वंजारी यांनी केली. चंद्रपूरमधून शांताराम पोटदुखे यांनी अनेक वर्ष लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, त्यानंतर तेली समाजाला कधीही लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे यावेळी चंद्रपूर, वर्धा किंवा विदर्भातील कोणत्याही मतदारसंघात तेली समाजाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी वंजारी यांनी केली. संबंधित मागणीवर विचार करण्याचे आश्वासन नेत्यांनी दिले.