आॅनलाईन लोकमतनागपूर : गुन्हेगारांच्या दोन टोळ्यातील वादामुळे मानकापूर चौकात आज प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तोडफोड आणि मारहाणीच्या या घटनेत एक निवृत्त पोलीस अधिकारी जबर जखमी झाला.कुख्यात आरोपी करीम लाला आणि त्याच्या टोळीची मानकापूर चौकात प्रचंड दहशत आहे. ते या भागात हप्ता वसुली, खंडणी वसुलीही करतात. निवृत्त समीउल्ला मजिद (वय ६२) हे पोलीस खात्यातील निवृत्त एएसआय आहेत. ते मानकापुरातील सिराज ले-आऊटमध्ये राहतात. त्यांचा भाऊ सिबगतउल्ला याने काही दिवसांपूर्वी कुख्यात करीम लालाचा साथीदार जहिन खान ऊर्फ मोहतसिन याला १५ हजार रुपये उधार दिले होते. ते परत करण्यासाठी जहिन टाळाटाळ करीत होता. सिबगतला तो शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास मानकापूर चौकात दिसला. त्यामुळे त्याला पैशाची मागणी करून सिबगतने आपल्या मोठ्या भावाला समिउल्ला यांना फोन करून १५ हजार रुपये घ्यायला येण्यास सांगितले. समिउल्ला तेथे पोहचले. पैसे देण्याच्या वादातून जहिन आणि सिबगतमध्ये जोरदार हाणामारी झाली. मध्यस्थी करायला गेलेल्या समिउल्ला यांनाही आरोपी जहिनने बेसबॉलच्या दांड्याने मारहाण केली. त्यामुळे त्यांचा ओठ फाटला. या हाणामारीत जहिनचे साथीदार करीम लाला त्याचे गज्जू, समिर, अमन, ब्रह्मदेव मिश्रा आणि अन्य गुंड साथीदारांसह समिउल्ला आणि त्याच्या साथीदारांवर तुटून पडले. परिसरातही तोडफोड केली. ही माहिती कळाल्याने एक पोलीस अधिकारी तेथे दुचाकीने पोहचला. त्यांना पाहून आरोपी पळून गेले. दरम्यान, समिउल्ला आणि सिबगतला मारहाण झाल्याचे कळताच त्यांचे साथीदारही तेथे पोहचले. त्यांनी मानकापूर चौकातील काही तरुणांना मारहाण केली. दगडफेक करून दुकानात तोडफोड करत दहशत निर्माण केली. सुमारे अर्धा ते पाऊण तास ही गुंडगिरी सुरू होती. त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांचा मोठा ताफा चौकात पोहचला. पोलिसांनी समिउल्ला यांच्या तक्रारीवरून आरोपी जहिन, करीम लाला आणि अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला तर, विरोधी गटाने दिलेल्या तक्रारीवरून समिउल्लाच्या गटातील गुंडांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती.नागरिकांचा रोषया घटनेमुळे नागरिकांचा रोष उफाळून आला. त्यांनी पोलिसांसमोर गुंडांच्या दहशतीविरोधात घोषणाबाजी करून या भागातील गुंडगिरी बंद करण्याची मागणी केली.