नागपूर : २७ जानेवारीला शाळा सुरू करण्यासंदर्भातील आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहे. परंतु आपत्ती व्यवस्थापन अधिकारी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात अजून कुठलेही निर्देश दिले नाही अथवा पत्रही काढले नाही. त्यांच्या आदेशाशिवाय शिक्षण विभाग कुठलीही कारवाई करू शकत नाही. त्यामुळे २७ जानेवारीला शाळा सुरू होतील का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी काढलेल्या परिपत्रकात राज्यातील सर्व शाळांमध्ये ५ ते ८ पर्यंतचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याची शासनाने मान्यता दिली असल्याचे सांगितले आहे. कोरोनाबाबतच्या केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करण्यात यावे, असेही निर्देश दिले आहे. परंतु याची प्रतिलिपी त्यांनी जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अथवा जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्तांना दिलेली नाही. त्यांनी प्रतिलिपीत शिक्षण विभागाच्या यंत्रणेलाच कळविले आहे. कोरोनाच्या आपत्तीच्या काळात शासनाने यापूर्वी दिलेले सर्व आदेश हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अथवा जिल्हाधिकाऱ्याच्या नावाने निर्गमित केले. यापूर्वी २३ नोव्हेंबर रोजी ९ ते १२ वर्गाच्या शाळा सुरू करण्यासंदर्भातसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केले होते. कोरोनाच्या काळात कुठलाही निर्णय घेण्याचे अधिकार शासन परिपत्रकानुसार स्थानिक प्रशासनाचे आहे. परंतु यंदा शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिवांनी स्थानिक अधिकाऱ्यांना कळविलेच नाही आणि स्थानिक प्रशासनाचा आदेश असल्याशिवाय शिक्षण विभाग कुठलीही कारवाई करू शकत नाही. अद्याप तरी महापालिकेच्या अथवा जि.प.च्या शिक्षण विभागाला आयुक्त अथवा जिल्हाधिकाऱ्यांकडून कुठल्याही सूचना आणि पत्र आलेले नाही. त्यामुळे विभागही अधिकाऱ्याच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे.