नागपूर : राज्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे लोकार्पण येत्या १ मे रोजी प्रस्तावित आहे. मुंबईत यासंदर्भात बुधवारी बैठक पार पडली. परंतु लोकार्पण कार्यक्रमाबाबत कुठलाही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती आहे. १ तारखेपर्यंत या महामार्गावरून वाहतूक सुरू करणे कठीण असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील नागपूर ते शिर्डी मार्गाचे लोकार्पण करण्याची राज्य सरकारची इच्छा आहे. परंतु विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याचा विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे काम पूर्ण झाल्यावरच लोकार्पण व्हावे. राज्य सरकार केवळ श्रेय लुटण्यासाठी घाईगडबडीत लोकार्पण करीत असल्याचा त्यांचा आरोप आहे. दुसरीकडे एमएसआरडीसीच्या मुंबईत पार पडलेल्या बैठकीत प्रकल्पाच्या कामांचा आढावा घेण्यात आला.
सूत्रांचे म्हणणे आहे की, नागपूरपासून शिर्डीपर्यंतच्या ५२० किमी महामार्गाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. हे काम २०२१ मध्ये पूर्ण व्हायला हवे होते. परंतु कोविड संक्रमणामुळे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यानंतर काम पूर्ण करण्याची कुठलीही डेडलाईन देण्यात आली नाही. वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील पुलांचे कामही पूर्ण होऊ शकले नाही. हे काम पूर्ण होण्यास अजूनही काही महिने लागणार. दुसरीकडे नागपुरातील शिवमडकापासून १० ते २० किमी अंतरावरील कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. हे काम करणाऱ्या मेघा इंजिनिअरिंग ॲंड इन्फ्रास्ट्रक्चर लि. शी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, काम गतीने होत आहे. परंतु ज्या ठिकाणी महामार्गाला वर्धा मार्ग पार करायचा आहे, तेथील काम अजूनही शिल्लक आहे.
जुन्या महामार्गाचा वापर
राज्य सरकारचे असे म्हणणे आहे की, लोकार्पणानंतर ज्या ठिकाणी काम पूर्ण झालेले नाही. तिथे जुन्या महामार्गाचा वापर केला जाईल. वाहनचालकांना तेथून मार्ग बदलावा लागेल. त्यामुळे वाहनचालकांना जास्तीत जास्त वेळ चार ते सहा मार्गावरील जुन्या महामार्गाचाच वापर करावा लागेल. त्यामुळे वाहनांची गती प्रभावित होण्याची शक्यता राहील.