नागपूर : यंदाचे हिवाळी अधिवेशन हे नागपुरात होणार की नाही, याबाबत शासनाने अजूनही ठोस निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे नागपुरात अधिवेशनासंदर्भातील तयारीचा कुठेही पत्ता नाही. यातच अधिवेशनाच्या कामासाठी होणारी तात्पुरत्या स्वरूपातील पदभरतीसुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे अधिवेशन नागपुरात होणार की नाही यासंदर्भातील संभ्रम पुन्हा वाढला आहे.
येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन आयोजित करण्याची घोषणा अगोदरच झालेली आहे. परंतु कोरोनाची पार्श्वभूमी व इतर कारणांमुळे अधिवेशनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे साांगितले जाते. २० डिसेंबरपासून अधिवेशन होईल, अशी चर्चा होती. परंतु सरकारने अद्याप यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. तसेच नागपुरातसुद्धा अधिवेशन तयारीसंदर्भातील कामे सुरू असल्याचे दिसून येत नाही. आमदार निवास, रविभवन, नागभवन, देवगिरी, रामगिरी यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी तयारीची कुठलीही कामे सुरु नाहीत. कर्मचाऱ्यांचे निवासस्थान असलेले १६० खोल्यांचे गाळे रिकामे करण्यात आले आहेत. मात्र तिथेही तयारी संदर्भात कुठलीही हालचाल दिसून येत नाही.
यातच अधिवेशन कालावधीसाठी सचिवालयात लिपिक-टंकलेखक व शिपाई, संदेशवाहक निव्वळ तात्पुरत्या स्वरुपातील पदभरती सुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. गं. हरडे यांनी कळविले आहे की, इच्छुक उमेदवारांना आवश्यतेनुसार २६ व २७ रोजी विधान भवन नागपूर येथे कक्ष क्र. १ मध्ये उपस्थित राहण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. परंतु काही कारणांस्तव मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मुलाखतीचा सुधारित कार्यक्रम यथावकाश कळविण्यात येईल. एकूणच नागपूरची परिस्थिती पाहता हिवाळी अधिवेशन नागपुरात होईल की नाही, यासंदर्भातील संभ्रम आणखी वाढला आहे.