लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवातही दुर्गादेवीच्या मूर्तीच्या उंचीबाबत प्रशासनाचे आदेश अजूनही न आल्याने मूर्तिकारांमध्ये संभ्रम आहेत. अश्विन नवरात्रोत्सव १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. आता केवळ एक महिना उरला असून मूूर्तीच्या उंचीबाबत आदेश आल्यास आर्थिक नुकसान सोसावे लागणार नाही, असे मूर्तिकारांनी सांगितले.
नवरात्रोत्सवात देवीची मूर्ती ६ ते ८ फूट उंच असते. मूर्ती तयार करण्यासाठी जवळपास १ महिना लागतो. प्रशासनाने मूर्तीच्या उंचीबाबत अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने सर्वच कामे अडकून पडली आहेत. याशिवाय गरबा आणि सांस्कृतिक कार्यक्रमासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. या संदर्भात सर्वांना प्रशासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. मूर्तिकार म्हणाले, यावर्षी अधिक महिना असल्याने नवरात्रोत्सव एक महिना उशिरा येत आहेत. त्यानंतरही मनपा आयुक्तांनी मूर्तिकारांची बैठक वा स्वत:हून आदेश दिलेला नाही. मूर्तीची उंची पाहून बेस तयार करावा लागतो. त्यानुसार मूर्ती तयार होते. दरवर्षी ६ किंवा ८ फूट उंच मूर्ती तयार होतात. यावर्षी गणेश मूर्तीची उंची ४ फूटापेक्षा जास्त नसावी, असे आदेश मनपा आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार काही मूर्तिकारांनी जास्त उंचीच्या मूर्ती तयार केल्या होत्या. त्या मूर्तीची स्थापना करण्यावर निर्बंध आले होते. हीच स्थिती दुर्गादेवीच्या मूर्तीसंदर्भात होऊ नये, असे मत चितार ओळ येथील सूर्यवंशी पेंटरचे संचालक विनोद सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.अजूनही ऑर्डर नाहीतमनपा आयुक्तांनी नवरात्रोत्सव मंडळाची बैठक न घेतल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अजूनही ऑर्डर दिलेली नाही. पण मंडळाची ८ फूट उंच मूर्तीला परवानगी देण्याची मागणी आहे. ही मागणी मान्य झाल्यास ८ फूट उंच मूर्ती तयार करण्यासाठी जवळपास एक महिना लागतो आणि उत्सवाला तेवढेच दिवस राहिले आहेत. काही मूर्तिकारांनी गणेशोत्सवाप्रमाणेच ४ फूट उंच मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक मंडळाकडून प्रतिसाद न मिळाल्याने अजूनही अनिश्चितता आहे.आर्थिक नुकसान सोसावे लागणारकोरोना महामारीमुळे मूर्तिकार आणि मंडळाशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन यंदा होणार नसल्याने अनेकांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. २० मार्चपासून राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मिरवणुका वा कोणतेही धार्मिक उत्सवाचे आयोजन झालेले नाही. चार वा सहा महिन्याच्या काळात कमाई करून वर्षभर कुटुंबाचा गाडा चालविणाऱ्यांना यंदा उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. ब्रॅण्ड, सजावट, मिरवणूक, ढोलताशे, मंडप डेकोरेशन आणि नवरात्रोत्सवाशी संबंधित सर्वच घटकांना आर्थिक फटका बसला आहे. या सर्वांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी अनेकांनी राज्य शासनाकडे केली आहे.