लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या प्रशासनासमोर रोज नवनव्या अडचणी पुढे येत आहेत. कुठे जनप्रतिनिधींकडून तर कुठे नागरिकांकडून या अडचणी निर्माण होत आहेत. शुक्रवारी रात्री जाफरनगरातील अनंतनगर परिसरात प्रशासनाच्या अनुमतीने होम क्वारंटाइन करण्यात आलेल्या नागरिकांवरून स्थानिक नागरिकांनी असाच गोंधळ घातला. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.क्वारंटाइन करण्यात आलेले हे नागरिक नवी दिल्लीशी संबंधित आहेत. त्यांच्या प्रवासाचा मागोवा लक्षात घेता त्यांना १४ दिवसासाठी क्वारंटाइन ठेवण्यात आले होते. या काळात घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आरोग्य विभागाच्या सूचनेवरून पुढील १४ दिवसासाठी होम क्वारंटाइन करायचे होते. मात्र लॉकडाऊन सुरू असल्याने जिल्ह्याच्या सीमा सील आहेत. यामुळे प्रशासनाने ग्रीन पार्कमधीलजाकीर खान यांना त्यांच्या मालकीच्या अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये या नागरिकांच्या निवासाला अनुमती दिली होती.प्रशासनाचीच होती परवानगीजिल्हा आपत्ती निवारण व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी जिल्हाधिकारी रवींद्र खजांची यांनी २४ एप्रिलला एक पत्र जारी करू न जाफरनगरातील अनंतनगर परिसरातील ग्रीन पार्क अपार्टमेंटच्या फ्लॅट नंबर ३०२ आणि ३०३ मध्ये होम क्वारंटाइन म्हणून काही लोकांना ठेवण्यासाठी परवानगी दिली होती. ३ मेपर्यंत त्यांना तिथे ठेवता येईल, असेही प्रशासनाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.ही तर मानवता !या प्रकारावर बोलताना जाकीर खान म्हणाले, मानवतेच्या भावनेने प्रशासनाच्या अनुमतीनंतर या नागरिकांना होम क्वारंटाइन म्हणून ठेवण्यासाठी आपण मदतीचा हात पुढे केला. भविष्यात कुणाच्या कुटुंबात अशी स्थिती उद्भवल्यावर होम क्वारंटाइन करायची वेळ आली तर त्यांना दूर लोटणार का? आम्हाला केवळ शारीरिक अंतर राखायचे आहे, सामाजिक नव्हे.यामुळे झाला गोंधळ!कोरोना संक्रमणाचा प्रसार थांबविण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे नागरिकांच्या रोषाचा सामनाही प्रशासनाला करावा लागत आहे. क्वारंटाइनचा काळ पूर्ण केल्यावर ज्यांना होम क्वारंटाइन होण्याचे आदेश देण्यात आले, ते सर्व जण नागपूरबाहेर राहणारे आहेत. सध्या वाहतूक व जिल्हा सीमा बंद असल्याने प्रशासनाला त्यांच्या निवासाची व्यवस्था नागपुरात करावी लागत आहे. त्यांना निवासी ठेवण्यासाठी या काळातही काही जागरूक नागरिक पुढे येत आहेत. मात्र स्थानिक नागरिकांमध्ये यासंदर्भात गैरसमज असल्याने हा विरोध व्यक्त होत आहे. परिणामत: या विषयावर आता प्रशासनाला वेळ खर्ची करावा लागत आहे. असाच विरोध क्वारंटाइन सेंटर उघडण्यालाही आहे. त्यामुळे प्रशासनाला व्यवस्था करताना बराच त्रास होत आहे.
वानाडोंगरी केंद्रातील त्या १२६ जणांना अखेर हलवले
वानाडोंगरी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेल्या त्या १२६ लोकांना शनिवारी नागपुरात स्थानांतरित करण्यात आले. चार बसेसने या लोकांना नागपुरातील विविध क्वारंटाईन सेंटरमध्ये शिफ्ट करण्यात आले. वानाडोंगरी येथील सामाजिक न्याय विभागाच्या मुलांच्या वसतिगृहातील क्वारंटाईन सेंटरमध्ये सतरंजीपुरा येथील १२६ जणांना ठेवण्यात आले होते. याची माहिती होताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी याला प्रचंड विरोध केला. लोकभावनेचा आदर करीत जिल्हा प्रशासनाने शनिवारी या लोकांना दुसरीकडे शिफ्ट केले. यानंतर वसतिगृह व परिसरात फवारणीही करण्यात आली.