परीक्षा केंद्रावर फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरोग्य विभागाच्या विविध पदांसाठी रविवारी राज्यभरात परीक्षा झाल्या. प्रश्नपत्रिकेच्या बाबतीत केंद्रावर गोपनियता न बाळगल्याचे परीक्षार्थींच्या लक्षात आल्याने विद्यार्थ्यांनी नागपुरातील रायसोनी कॉलेजच्या केंद्रावर गोंधळ घातला.
नागपुरात दोन दिवसांचा लॉकडाऊन असतानाही मोठ्या संख्येने परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले होते. शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते १२ या कालावधीत पेपर होता, पण विद्यार्थ्यांना सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास केंद्रावर बोलाविले होते. सकाळी १० वाजता रायसोनी कॉलेजच्या केंद्रावर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेचे सील तुटलेले असल्याचे परीक्षार्थींच्या लक्षात आल्याने परीक्षार्थींनी गोंधळ घातला. परीक्षकाने विद्यार्थ्यांसमोर प्रश्नपत्रिकेचे सील तोडणे अपेक्षित आहे, पण पूर्वीच सील तुटलेले होते. परीक्षार्थींनी यावर आक्षेप घेतला. त्यामुळे पोलिसांना बोलाविण्यात आले. राज्यभरातच परीक्षा केंद्रावरील गोंधळाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. परीक्षेत मोठ्या प्रमाणात सेटिंग झाल्याची ओरड परीक्षार्थींनी केली आहे. शिवाय परीक्षा केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. एका टेबलवर दोन परीक्षार्थींना बसविण्यात आले होते, यावरही परीक्षार्थींनी आक्षेप घेतले.