नागपूर: दिवाळी पूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने सीताबर्डीच्या मेन रोडवर खरेदीसाठी नागपूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास खरेदीची लगबग सुरू असतानाच मेन रोडवरील संगम पतंग नावाची बिल्डींगमधील गारमेंट व जनरल स्टोअर्सला आग लागली. आगीचा भडका उडताच खरेदीसाठी आलेल्या नागपूरकरांची पळापळ सुरू झाली. अवघ्या काही मिनिटातच अग्निशमनला कॉल आला. गर्दीची दाटी काढत अग्निशमनचे पथक घटनास्थळी पोहचले. आगीची गंभीरता लक्षात घेता ९ फायर स्टेशनवरून १० फायर टेंडर तासाभरातच पोहचले. तरीही ५ तास आगीवर नियंत्रण करण्यास लागले.
संगम पतंग नावाने असलेली ही चार माळ्याची इमारत आहे. या इमारतीच्या तळ मजला व पहिल्या माळ्यावर अजय गारमेंट व पद्मा जनरल स्टोअर्स आहे. या दुकानांमध्येचही लाग लागली. दुपारच्या सुमारास सीताबर्डी मेन रोडवर खरेदीसाठी भरपूर गर्दी होती. आगीचा भडका उडताच लोकांची पळापळ सुरू झाली. सीताबर्डी पोलीसांनी परिसर रिकामा केला. लगतच्या विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद केली. परिसरात गर्दी असल्याने अग्निशमन विभागाला आग विझविण्यास काहीसा त्रास झाला. आगीचे नेमके कारण व नुकसानीचा अंदाज बातमी लिहेपर्यंत कळू शकला नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी घटनास्थळावर मुख्य अग्निशमन अधिकारी भीमराव चंदनखेडे, तुषार बाराहाते, भगवान वाघ, सुनिल डोकरे, सुरेश आत्राम यांच्यासह कर्मचाऱ्यांनी कार्य केले.
मुरली ॲग्रो लि. कंपनीच्या कार्यालयाला आग ईस्ट वर्धमाननगरात चार माळ्याच्या इमारतीत मुरली ॲग्रो. लि. कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयाला सकाळच्या सुमारास आग लागल्याने कार्यालयातील संपूर्ण साहित्य आगीत जळून खाक झाले. अग्निशमन विभागाला कॉल आल्यानंतर लगेच लकडगंज अग्निशमन केंद्रातून गाड्या घटनास्थळी रवाना झाला. आगीची गंभीरता लक्षात घेता सक्करदरा, कळमना व सुगतनगर येथूनही फायर टेंडर घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन पथकाच्या प्रयत्नाने अडीच तासांत आग विझविण्यात आली. आगीचे नेमके कारण कळले नाही, पण अग्निशमन विभागाच्या पथकामुळे कंपनीच्या अडीच कोटींच्या साहित्याची बचत झाल्याची माहिती आहे. लकडगंज झोनचे अग्निशमन अधिकारी दिलीप चौहान यांच्या नेतृत्वात अशोक पोटभरे, रणदिवे व शिर्के यांच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले.