नागपूर : रेल्वे गाडीच्या नव्या वेळेची कल्पना नसल्यामुळे जुन्याच वेळेवर प्रवासी स्थानकावर पोहोचले; मात्र नियोजित वेळेपूर्वीच ती ट्रेन निघून गेल्याचे कळाल्यामुळे संतप्त प्रवाशांनी रेल्वेस्थानकावर जोरदार गोंधळ घातला. रेल्वे पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी संतप्त प्रवाशांची समजूत काढल्याने प्रकरण शांत झाले. रविवारी रात्री येथील रेल्वेस्थानकावर हा प्रकार घडला. त्यामुळे काही वेळेसाठी स्थानकावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
जबलपूर नागपूर एक्स्प्रेसचा तीन दिवसांपूर्वीच विस्तार झाला आहे. आता ही ट्रेन अमरावतीपर्यंत धावते. त्याचप्रमाणे जबलपूरला जाण्यासाठी नागपूरऐवजी अमरावती येथून निघते. ती आधी नागपूर स्थानकावरून ९.४५ वाजता निघायची. आता नवीन वेळेनुसार रात्री ७.३५ वाजताच निघते. आज ती ७.३५ वाजता जबलपूरकडे निघाली; मात्र या नव्या बदलाची कल्पना नसल्याने या ट्रेनने जाण्यासाठी तिकीट काढलेले अनेक प्रवासी ९ ते ९.३० च्या सुमारास नागपूर स्थानकावर पोहोचले; मात्र ती ट्रेन आधीच निघून गेल्याचे त्यांना कळले. त्यामुळे ते संतप्त झाले.
प्रवाशांनी रेल्वेस्थानकावरच्या फलाट क्रमांक एकवर असलेल्या स्टेशन डायरेक्टरच्या चेंबरसमोर गोंधळ घालणे सुरू केले. आरडाओरड, धावपळ वाढल्याने स्थानकावर तणावाची स्थिती निर्माण झाली. ते बघून जीआरपी, आरपीएफचे जवान धावले. त्यांनी संतप्त प्रवाशांची कशीबशी समजूत काढली. बऱ्याच वेळेनंतर त्यांना शांत करण्यात पोलिसांना यश आले.