लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुकान हडपण्याच्या प्रकरणात बजाजनगर पोलीस ठाण्यात गेल्या तीन दिवसांपासून गोंधळ सुरू आहे. चोरी आणि जबरीने प्रवेश करण्याच्या प्रकरणाची नोंद झाल्यानंतरही प्रकरण शांत होत नसल्याचे दिसून येत आहे.
कांचिपुरा येथे एक महिला भोजनालय चालविते. भोजनालयाच्या शेजारी एक खोली होती. ती खोली त्या महिलेने एका व्यक्तीला भाड्याने दिली. भाडेकरूच्या मृत्यूनंतर एका टेलरने तेथे शिकवण कामाचे दुकान सुरू केले. महिला त्याच्यावर दुकान रिकामे करण्याचा दबाव टाकत होती. दुकान खाली केले नसल्याने महिलेने रविवारी जबरीने दुकानाचा कब्जा घेतला. टेलरचे साहित्य रस्त्यावर ठेवून, तिने आपले टाळे लावले. यावर टेलरने बजाजनगर पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी महिलेच्या विरोधात चोरी, तसेच दुकान हडपण्याचा गुन्हा नोंदविला. प्रकरणाची नोंद झाल्यापासून टेलर पोलिसांवर दुकानाचा कब्जा परत मिळवून देण्याचा दबाव टाकत आहे. त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही याबाबत भेट घेतली. त्याअनुषंगाने अधिकाऱ्यांनी बजाजनगर पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. त्यानंतर पोलीस मंगळवारी दुपारी घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांकडून दुकानात जबरीने टेलरचे साहित्य ठेवण्याच्या भीतीने महिला उग्र झाली. तिने आत्मदहनाचा इशारा देत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याचवेळी काही नेते महिलेच्या समर्थनार्थ घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीसही शांत झाले. या प्रकरणाबाबत ना ना तऱ्हेच्या चर्चांनी पेव पकडला आहे.
..................