काँग्रेसची पुन्हा तीन पदाधिकाऱ्यांवर कारवाई
By कमलेश वानखेडे | Published: June 27, 2024 05:51 PM2024-06-27T17:51:43+5:302024-06-27T17:52:12+5:30
Nagpur : विजय देवतळे, आसावरी देवतळे, विलास राऊत सहा वर्षांसाठी निलंबित
नागपूर : लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम केल्याच्या तक्रारींची दखल घेत प्रदेश काँग्रेसकडून कारवाई केली जात आहे. आता चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील तीन पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विजय देवतळे व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आसावरी देवतळे तसेच यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील विलास मारोतराव राऊत यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या संबंधीचे पत्र प्रदेश उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) नाना गावंडे यांनी जारी केले आहे. याची माहिती संबंधित जिल्ह्यांच्या जिल्ध्ध्यक्षांना देखील कळविण्यात आली आहे. डॉ. आसावरी देवतळे यांनी २०१४ मध्ये वरोरा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. लोकसभेत त्यांनी पक्षविरोधी काम केल्याची तक्रार खा. प्रतिभा धानोरकर यांच्या समर्थकांकडून करण्यात आली होती. या तक्रारीची प्रदेश काँग्रेसने दखल घेत कारवाई केली आहे.
लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम केल्याबद्दल
स्थानिक पातळीवरून अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारींची प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे स्वत: खातरमजा करीत आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून पडताळणी करून अहवाल मागवित आहे. यात दोषी आढळले तर तत्काळ कारवाई केली जात आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया करण्यासाठी कुणी पुढाकार घेऊ नये म्हणून प्रदेश काँग्रेसतर्फे आतापासूनच कठोर पावले उचलली जात आहेत.