अर्णबविरोधात काँंग्रेस आक्रमक, महाराष्ट्रभरात पोलीस तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 01:06 AM2020-04-23T01:06:48+5:302020-04-23T01:13:05+5:30
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात आपत्तीजनक वक्तव्य केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ व वृत्तनिवेदक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात नेते व कार्यकर्त्यांनी राज्यभरात पोलीस तक्रारी दाखल कराव्या, असे निर्देश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात व कार्याध्यक्ष तसेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात आपत्तीजनक वक्तव्य केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ व वृत्तनिवेदक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात नेते व कार्यकर्त्यांनी राज्यभरात पोलीस तक्रारी दाखल कराव्या, असे निर्देश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात व कार्याध्यक्ष तसेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी दिले. नितीन राऊत यांच्यासह दुग्ध व पशुविकास मंत्री सुनील केदार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत, रामकृष्ण ओझा, बंटी शेळके व इतरांनी नागपुरातील सदर पोलीस ठाण्यात अर्णब गोस्वामी विरोधात तक्रार दाखल केली. भादंविच्या कलम ११७, १२० ब, १५३, १५३ अ, २९५ अ, २९८, ५००, ५०४, ५०५ व ५०६ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० मधील कलम ६६ अ अंतर्गत अर्णबला त्वरित अटक करण्यात यावी, अशी यावेळी मागणी करण्यात आली.
काँग्रेसचे मंत्री व नेत्यांनी झोन दोनच्या उपायुक्त विनिता साहू यांच्याकडे तक्रार सादर केली. या तक्रारीच्या आधारे अर्णब गोस्वामी विरोधात जातीयवादी भावना भडकविणे व बदनामी अब्रूनुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यासोबतच काँग्रेसचे शहराध्यक्ष आ.विकास ठाकरे यांनीदेखील गोस्वामी विरोधात राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पालघर सामूहिक हत्याकांडावर अर्णब गोस्वामीने सोनिया गांधी यांच्याविरोधात केलेले वक्तव्य हे देश व राज्यातील जातीयवादी भावना भडकवून सामाजिक सौहार्द्र बिघडविण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे गोस्वामी विरोधात त्वरित कारवाई व्हावी या मागणीसाठी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जाणार असल्याची माहिती नितीन राऊत, सुनील केदार व सतीश चतुर्वेदी यांनी लोकमतशी बोलताना दिली. यानंतर नितीन राऊत, सुनील केदार, चतुर्वेदी, कुणाल राऊत, बंटी शेळके, अतुल लोंढे, रामकृष्ण ओझा यांच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री अनिल देशमुख यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व गोस्वामी विरोधात त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. गृहमंत्र्यांनी पूर्ण प्रकरण सखोलपणे ऐकून घेतले व कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
त्यांच्या तक्रारीवर काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या वैयक्तिक हल्ल्यामुळे गोस्वामी यांचे विशिष्ट समाजाविषयीचे वैर दिसून आले. हा विशिष्ट समाजातील लोकांना इतरांविरुद्ध भडकविण्याचा प्रयत्न होता. तक्रारकर्ते पुढे म्हणाले आहे की, गोस्वामी यांची कृती काँग्रेस पक्षाची व पक्षाच्या अध्यक्षांची बदनामी करणारी आहे. तसेच, त्यांनी विवेकबुद्धीचा उपयोग व होणाऱ्या परिणामांची चिंता न करता वक्तव्य केले आहे. गोस्वामी यांनी मंगळवारी संबंधित वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात हे वक्तव्य केले. परंतु, त्यांनी त्यावर खुलासा केला नाही किंवा माफीही मागितली नाही. अशा वक्तव्यामुळे विविध धार्मिक समूहांमध्ये कटुता, शत्रूत्व, वाईट विचार व द्वेषभावना पसरते. विविध धार्मिक समूहामधील एकोप्याच्या भावनेला नष्ट करणारी ही कृती आहे. अशा कृतीमुळे समाजातील शांतीदेखील भंग होते. पालघर घटनेमध्ये एकही आरोपी अल्पसंख्यक समाजातील नाही, असे त्यांनी सांगितले.
भादंविच्या विविध कलमांतर्गत कारवाईची मागणी करताना तक्रारकर्त्यांनी नमूद केले की, गोस्वामी यांनी राज्यघटनेतील मूलतत्त्वावर आघात केला आहे आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचा संपूर्ण देशावर परिणाम होण्याची शक्यता आहे.