नोटाबंदीचा निर्णय चुकीचा : पंतप्रधान मोदींवर टीका नागपूर : नोटाबंदीच्या विरोधात काँग्रेसने बुधवारी नागपुरात आक्रमक आंदोलन केले. रिझर्व्ह बँक असलेल्या संविधान चौकात आयोजित धरणे आंदोलनात काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली. मोदींच्या चुकीच्या निर्णयाला विरोध न करता त्याची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी केल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही नेत्यांनी केली. यानंतर काँग्रेस नेत्यांचे शिष्टमंडळ मागण्यांचे निवेदन देण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या दिशेने निघाले. त्यांच्या पाठोपाठ पोलिसांनी लावलेले कठडे तोडून शेकडो कार्यकर्ते रिझर्व्ह बँकेच्या मुख्य द्वारावर पोहचले. पोलिसांनी गेट बंद करताच कार्यकर्त्यांनी गेटवर चढून रिझर्व्ह बँकेत घुसण्याचा प्रयत्न केला. मोठ्या संख्येने तैनात असलेल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखून धरले. या वेळी बाचाबाजी होऊन सुरुवातीला पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन गाडीत डांबले. या कार्यकर्त्यांना सोडविण्याठी आ. सुनील केदार व युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष बंटी शेळके कार्यकर्त्यांसह तुटून पडले. पोलीस गाडीला घेराव घातला. यावेळी ओढाताणी झाली. शेवटी पोलिसांनी लाठीमार केला. जवळच असलेल्या विधानभवन चौकापर्यंत पाठलाग करून पोलिसांनी कार्यकर्त्यांवर बेत चालविले. पसार झालेल्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या टोकावरून पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांकडून साध्या वेशातील पोलिसांवरही लाठीमार करण्यात आला. आंदोलनात माजी खा. गेव्ह आवारी, माजी आ. अशोक धवड, प्रदेश सचिव डॉ. बबनराव तायवाडे, प्रफुल्ल गुडधे, अतुल कोटेचा, उमाकांत अग्नीहोत्री, अभिजित सपकाळ, कुंदा राऊत, नगरसेवक प्रशांत धवड, अजय हिवरकर, हर्षवर्धन निकोसे, शांता कुमरे, पदमाकर कडू, विजय बाभरे, डॉ. गजराज हटेवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी) कार्यकर्ते जखमी पोलिसांच्या लाठीमारात काँग्रेसचे कार्यकर्ते अजिंक्य देशमुख गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ खासगी इस्पितळात हलविण्यात आले. एनएसयूआयचे नागपूर शहर अध्यक्ष अमीन नूरी यांचा हात फ्रॅक्चर झाला. गौतम कांबळे, मंगेश शेंडे, युवक काँग्रेस उत्तर नागपूर अध्यक्ष आसीफ शेख, प्रदेश सचिव प्रकाश साबळे (अमरावती), आकाश तायवाडे, पिंटू तिवारी यांना जबर दुखापत झाली. धावपळीत महिला कार्यकर्त्याही जखमी झाल्या. साध्या वेशातील पोलिसांवरही लाठ्या आंदोलनाची अंतर्गत माहिती घेण्यासाठी साध्या वेशातही पोलीस तैनात करण्यात आले होते. आंदोलन भडकले व पोलिसांनी लाठीमार सुरू केला. यावेळी साध्या वेशातील पोलिसांनाही लाठ्या खाव्या लागल्या. त्यांनी आपबिती सांगितली. तिन्ही कार्यकर्त्यांना सोडले प्रारंभी झालेल्या लोटालोटीनंतर पोलिसांनी काँग्रेसचे शहर सचिव इरशाद अली, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव धीरज पांडे, आणखी एका कार्यकर्त्याला ओढत नेत पोलीस गाडीत टाकले. कार्यकर्त्यांच्या विरोधानंतरही पोलीस तिघांनाही घेऊन गेले. याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते रिझर्व्ह बँकेसमोरच ठाण मांडून बसले. शेवटी पोलीस काँग्रेस नेते अभिजित वंजारी, राजू व्यास व तानाजी वनवे यांना सोबत घेऊन गेले. या नेत्यांनी अटकेतील कार्यकर्त्यांच्या वतीने हमीपत्र दिले. त्यानंतर पोलीस अटकेतील तिघांनाही घेऊन आंदोलनस्थळी आले. पोलिसांकडून दिलगिरी लाठीमाराच्या निषेधार्थ ठाण मांडून बसलेल्या काँग्रेस नेत्यांनी लाठीमाराचे आदेश देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी लावून धरली. नेत्यांना समजविण्यासाठी पोलीस उपायुक्त (झोन २) कलासागर व विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त रवींद्र परदेशी आले. यावेळी नेत्यांनी लाठीमाराचे आदेश देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला आधी निलंबित करा तेव्हाच जागा सोडू, अशी भूमिका घेतली. शेवटी परदेशी यांनी गैरसमजातून व चुकीने लाठीमार झाल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली. अटक केलेल्या कार्यकर्त्यांना सोडण्यात येत असल्याचेही सांगितले.
काँग्रेस आक्रमक
By admin | Published: January 19, 2017 2:38 AM