राहुल गांधींना जीवे मारण्याच्या धमकीवरून काँग्रेस आक्रमक, रस्ता रोको करीत निषेध
By कमलेश वानखेडे | Published: September 13, 2024 05:27 PM2024-09-13T17:27:02+5:302024-09-13T17:27:38+5:30
राहुल गांधी यांना धमकी : विकास ठाकरे, वंजारींसह पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात
नागपूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांना भाजपाचे माजी आमदार तरविंदरसिंग मारवा यांच्याकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा निषेध करीत नागपूर शहर काँग्रेसने शुक्रवारी व्हेरायटी चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी मारवा यांना अटक करण्याची मागणी करीत संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केला. यावेळी शर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, आ. ॲड. अभिजित वंजारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. यावेळी आ. विकास ठाकरे यांनी भाजप नेत्यांवर नेम साधला. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभरात प्रेमाचा संदेश देणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन भाजपची खरी मानसिकता समोर आली आहे. राहुल गांधी यांच्या केसालाही धक्का लागला तर देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असा इशाही यावेळी आ. ठाकरे यांनी दिला. आंदोलनादरम्यान आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, गिरीश पांडव, प्रदेश महासचिव अतुल कोटेचा, उमाकांत अग्नीहोत्री, विशाल मुत्तेमवार, कमलेश समर्थ, संजय महाकाळकर, प्रशांत धवड आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आंदोलनात अ.भा. काँग्रेस समितीचे सचिव नितीन कुंभलकर, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष नंदा पराते, प्रज्ञा बडवाईक, रेखा बाराहाते, रमन पैगवार, आकाश तायवाडे, प्रमोद सिंग ठाकूर, विलास बरडे, राम कळंबे, विवेक निकोसे, रवी गाडगे, श्रीकांत ढोलके यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.