नागपूर : नायलॉन मांजामुळे सातत्याने अपघाताच्या घटना घडत असताना, प्रशासन गप्प असल्यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. नायलॉन मांजामुळे एका युवकाचा प्राण गेला. या घटनेमुळे प्रशासनाविरुद्ध नागरिक असंतोष व्यक्त करीत आहेत. पश्चिम नागपूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रिजवान खान रुमवी यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयाला घेराव घालून निदर्शने केली.
नायलॉन मांजाची चोरून विक्री थांबवावी आणि काळाबाजार करीत असलेल्या दुकानदारांवर कडक कारवाई करण्याबाबत अतिरिक्त आयुक्त राम जोशी व महापौर दयाशंकर तिवारी यांना निवेदन सोपविण्यात आले. यासोबतत नायलॉन मांजामुळे जीव गमावलेल्या युवकाच्या कुटुंबाला १० लाख रुपये मोबदला देण्याची मागणी करण्यात आली. मोबदला न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. नायलॉन मांजामुळे अपघाताच्या घटना वाढत आहेत. गळा कापल्यामुळे २० वर्षांच्या युवकास जीव गमवावा लागला. या घटनेसाठी महापालिका प्रशासन दोषी असल्यामुळे महापालिका आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. नागरिक नायलॉन मांजामुळे त्रस्त असताना महापौर शुभेच्छा घेण्यात व्यस्त असल्यामुळे ‘प्रशासन होश मे आओ’ असे नारे यावेळी देण्यात आले. आंदोलनात देवेंद्र रोटेले, युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष सत्यम सोडगीर, सुकेशिनी डोंगरे, जुबेर शेख, करुणा घरडे आदी उपस्थित होते.
........