नागपूर : केंद्रातील भाजपाप्रणित मोदी सरकारच्या काळात वाढलेली महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार आणि शेतकरी विरोधी धोरणासह काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व नेते खा. राहुल गांधी यांना हेतूपुरस्सरपणे सक्तवसुली संचालनालयाची नोटीस (ईडी) बजावल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने सोमवारी सकाळी ११ वाजता ईडीच्या नागपुरातील सिव्हील लाईन्स येथील कार्यालयात तीव्र धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन होईल तर नागपुरातील आंदोलनाचे नेतृत्व ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत हे करणार आहेत. ओबीसी विकासमंत्री विजय वडेट्टीवार, महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, पशुसंवर्धन व क्रीडामंत्री सुनील केदार, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, आ. कुणाल पाटील यांच्यासह नागपूर, अमरावती व संपूर्ण विदर्भातील काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. नागपुरातील आंदोलनाच्या समन्वयाची जबाबदारी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख व नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.