नागपुरात काँग्रेसचे मोदी सरकारविरोधात आंदोलन; पंतप्रधानांच्या 'त्या' वक्तव्याचा केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 01:25 PM2022-02-09T13:25:07+5:302022-02-09T13:45:19+5:30
मुंबई व महाराष्ट्रानेच देशभर कोरोना पसरविला, या आरोपामुळे काँग्रेस संतापली आहे. नागपुरातील संविधान चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करून मोदी सरकारचा निषेध नोंदवला.
नागपूर : पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी लोकसभेत काँग्रेसविरोधात जोरदार टीका केली होती. मुंबई व महाराष्ट्रानेच देशभर कोरोना पसरविला, असे वक्तव्य त्यांनी केले होते. या आरोपामुळे काँग्रेस संतापली आहे. आज नागपुरात काँग्रेसच्या वतीने मोदींच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी संसदेत करोना प्रसाराबाबत काँग्रेस व महाविकास आघाडी सरकारबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यात उमटले आहेत. नागपुरातील संविधान चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन' करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करून मोदी सरकारचा निषेध नोंदवला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी महाराष्ट्र व दिल्लीच्या सरकारांवर टीकेची झोड उठवली. कोरोना विषाणू संक्रमणाच्या रुपाने जग गेल्या शंभर वर्षांतील भयंकर महामारी अनुभवत असताना विरोधकांनी सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सोडले नाहीत, जगभर भारताची बदनामी करण्याची मोहीम राबविण्यात आली, असा गंभीर आरोप केला.
महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीचा घटकपक्ष काँग्रेस हे त्यांचे खास लक्ष्य होते. २०२० च्या मार्च-एप्रिल-मे महिन्यात लॉकडाऊनवेळी ‘असाल तिथेच थांबण्या’च्या सूचना असताना काँग्रेस नेत्यांनी मुंबईत परप्रांतीय मजुरांना मोफत रेल्वे तिकिटे पुरवली व त्यांना त्यांच्या राज्यात पाठविले. दिल्लीतही परप्रांतीयांना शहराबाहेर काढून देण्यात आले. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, पंजाबसह देशभर कोरोना पसरविण्याचे पाप काँग्रेसने केले, अशी टीका पंतप्रधानांनी केली होती. यानंतर, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संपूर्ण राज्यभरात आजपासून ‘मोदी माफी मागो’ या मागणीसाठी आंदोलन करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार नागपूरमध्ये हे आंदोलन करण्यात आले.