नागपूर : नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी दुसऱ्या फेरीच्या चौकशीसाठी काँग्रेसच्याच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा बोलवण्यात आले. या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून देशभरात कार्यकर्त्यांच्यावतीने आंदोलन सुरू आहे. नागपुरातही काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, संतप्त कार्यकर्त्यांनी जीपीओ चौकात कार पेटवून दिली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सोनिया गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईचा निषेध म्हणून राज्यभर काँग्रेसचे आंदोलन असतांना नागपूरमध्ये आंदोलनादरम्यान एका वाहनाची जाळपोळ करण्यात आली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन शहरातील जीपीओ चौकात सुरू होते त्यावेळी ही घटना घडली.
महत्त्वाचं म्हणजे आंदोलनाची चर्चा घडवून आणण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भंगार मधून ती कार उचलून आणली व आंदोलनस्थळी पेटवून दिली. त्यामुळे सत्याग्रहाच्या नावावर नागपूरमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचीच प्रतिमा मलीन केल्याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात पोलिसांनी कुणाल राऊत सह इतर कार्यकर्त्यांना अटक केली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली असल्याची माहिती पोलीस उप आयुक्त संदीप पखाले यांनी दिली.