नागपूर : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्याचे पडसाद नागपुरातही उमटले. नागपूर शहर काँग्रेस कमिटीतर्फे सहाही विधानसभा मतदारसंघात आंदोलन करण्यात आले. कुठे भिडे यांच्या फोटोला काळे फासण्यात आले तर कुठे प्रतिकात्मक फुतळ्याचे दहन करण्यात आले. भिडे यांना तात्काळ अटक न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या नेतृत्त्वात शहरातील सहाही मतदारसंघात आंदोलन झाले. मध्य नागपुरातील गांधी पुतळा चौकात काँग्रेसचे प्रदेश महासिचव अतुल कोटेचा यांच्या नेतृत्त्वात आंदोलन झाले. भिडे हे विकृत मानसिकता असलेली व्यक्ती असून यावर वेळीच उपचार करण्याची गरज यावेळी कोटेचा यांनी व्यक्त केली. आंदोलनात रमन पैगवार, गोपाल पट्टम, कमलेश समर्थ, अब्दुल शकील आदींनी भाग घेतला. दक्षिण नागपुरातील मानेवाडा चौकात गिरीश पांडव यांच्या नेतृत्त्वात आंदोलन झाले.
भाजपला भिडेंचा वापर करुन महाराष्ट्राचे मणिपूर करायचे आहे का ? नाना पटोले यांचा थेट सवाल
आंदोलनात दिनेश तराळे, विश्वेश्वर अहिरकर, प्रविण गवरे आदींनी भाग घेतला. पूर्व नागपुरातील आंबेडकर पुतळा चौकात आ. अभिजित वंजारी यांच्या नेतृत्त्वात आंदोलन झाले. आंदोलनात ज्ञानेश्वर ठाकरे, युवराज वैद्य, राजेश पौनीकर आदींनी भाग घेतला. पश्चिम नागपुरात लक्ष्मीभवन चौक धरमपेठ येथे झालेल्या आंदोलनात ब्लॉक अध्यक्ष राजू कमनानी, देवेंद्र रोटेले, प्रमोद सिंह ठाकुर आदींनी भाग घेतला.