नागपूर :काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात वाद उफाळून आला असताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या दोन खंदे समर्थक असलेले माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार व आ. अमर राजूरकर या दोन नेत्यांनी बुधवारी दिल्ली गाठत राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी राज्यातील एकूणच राजकीय परिस्थिती खरगे यांच्यासमोर मांडल्याची माहिती आहे.
पटोले- थोरात वादात विदर्भातील एकही नेता उघडपणे पटोले यांच्या बाजूने उभा राहिलेला नाही. उलट विदर्भातील नेत्यांचा मोठा गट पटोले यांच्या कार्यशैलीवर नाराज आहे. मंगळवारी माजी मंत्री सुनील केदार यांनी उघडपणे थोरात यांची बाजू घेतली होती. त्यापाठोपाठ विजय वडेट्टीवार व अमर राजूरकर दिल्लीत दाखल झाले.
उघड चर्चेचे संकेत...
प्राप्त माहितीनुसार या दोन्ही नेत्यांनी पटोले- थोरात वादाचा परिणाम राज्यातील काँग्रेसच्या एकूणच वातावरणावर होत असल्याची बाजू मांडली. दरम्यान, तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे हेदेखील गुरुवारी सकाळी दिल्लीत दाखल झाले. नाना पटोले यांनी १५ फेब्रुवारी रोजी मुंबईत प्रदेश काँग्रेसची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत या मुद्द्यावर उघड चर्चा करण्याचे संकेत काही नेत्यांनी आधीच दिले आहेत. मात्र, या बैठकीपूर्वी दिल्लीचा कल आपल्या बाजूने करण्यासाठी पटोले विरोधकांनी हालचाली सुरू केल्या आहेत.