उत्तर नागपुरात आंदोलन : गरिबांवर अन्याय कशासाठी ? नागपूर : देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यापासून जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले असून यामुळे जनता त्रस्त झाली आहे. शासनाचे साठेबाजीवर नियंत्रण नसल्यामुळे त्याचा परिणाम गरीब व मध्यमवर्गीयांवर होत आहे. त्यामुळे महागाईच्या विरोधात नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात शनिवार बाजारपेठ कमाल चौकात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. उत्तर नागपूर काँग्रेस कमिटीने माजी मंत्री नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात शहर ्ध्यक्ष विकास ठाकरे, सेवादलाचे संघटक कृष्णकुमार पांडेय, नगरसेवक संदीप सहारे, मिलिंद चवरे, खुशाल हेडाऊ, मिलिंद सोनटक्के, प्रा.डॉ. जयंत जांभुळकर, नगरसेवक सुरेश जग्याशी, भावना लोणारे, महेंद्र बोरकर, सिंधू उईके, आमीर नूरी, आसीफ शेख, विजयालक्ष्मी हजारे, सलीम खान आदींनी भाग घेतला. यावेळी कुणाल राऊत यांनी महागाईच्या विरोधात सत्ताधारी भाजप सरकारवर हल्ला चढविला. ते म्हणाले, राज्याची अर्थव्यवस्था अनियमित झाली आहे. पूर्वी १०० रुपयात भरणारी भाजीपाल्याची पिशवी आज ६०० रुपयातही भरत नाही. सामान्य जनतेला डाळ व भाजीपाल्यापासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र शासन रचत आहे. शासन वचननाम्यात फोल ठरल्याची टीका त्यांनी केली. आंदोलनात सायंकाळी ५ ते रात्री ८ दरम्यान महिलांनी भाववाढविरोधातील अॅप्रॉन घालून कांदा, भेंडी, मिरचीच्या माळा टाकून महागाईचा विरोध करीत जनजागृती केली. काँग्रेस सरकार सत्ताधारी भाजप सरकारला त्यांची जागा दाखवून दिल्यशिवाय राहणार नसल्याचे नगरसेवक संदीप सहारे यांनी सांगितले. आंदोलनात उना गावात दलितांवर झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यात आला. जनजागृती अभियानात युवक काँग्रेस, एनएसयूआय, महिला काँग्रेसचे विनोद सोनकर, हरिभाऊ किरपाने, माजी नगरसेवक मार्टिन मोरेश, हिरा गेडाम, मन्सूर खान, ममता गेडाम, तुषार नंदागवळी, सलीम मस्ताना, गौतम अंबादे, किरण यादव, बेबी गौरीकर, इरशाद शेख, राकेश निखार, राकेश निकोसे, खतीजा अली, प्रीतेश पाटील, मोसीन खान, आशिष साखरे, जय मोरयानी, अरमान खान, ममता सयाम, सुनंदा राऊत आदी सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)
भाववाढ विरोधात काँग्रेसचा हल्लाबोल
By admin | Published: July 24, 2016 2:08 AM