लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या प्रभाग ३५(अ) या जागेसाठी ११ आॅक्टोबरला पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारपर्यंत १४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीसाठी भाजपा, काँग्रेस व बसपा सज्ज झाले आहेत. त्यातच अपक्षांनीही दंड थोपटल्याने या प्रभागातील निवडणूक चुरशीची होणार आहे.भाजपाचे नगरसेवक नीलेश कुंभारे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. भाजपाकडून या जागेवर कुंभारे यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल, अशी कालपर्यंत चर्चा होती. मात्र शनिवारी अचानक माजी नगरसेवक संदीप गवई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे गवई या प्रभागातील रहिवासी नसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.भाजपातर्फे संदीप गवई, आशिष थोरात यांनी उमेदवारी दाखल केली आहेत. काँग्रेसतर्फे पंकज थोरात व वासुदेव ढोके यांनी तर बसपाकडून अजय डांगे, विशाल वानखेडे व नंदी झोडापे यांचा समावेश आहे. अन्य उमेदवारात वंदना जीवने, शशिकला नारनवरे, सुधाकर खोंडे, मनोज इंगळे, सुनील कवाडे, माधुरी उके व गौतम कांबळे आदींचा समावेश आहे. कांबळे यांनी बसपा व अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. भाजपा, काँग्रेस व बसपाच्या एकाहून अधिक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामुळे उमेदवारी मागे घेण्याच्या २७ सप्टेंबर नंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे ३१ आॅनलाईन उमेदवारी अर्ज आले होते. यापैकी १० जणांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल के ले होते. यातील १५ जणांनी कागदपत्रे सादर केली. २५ सप्टेंबरला नामनिर्देशनपत्राची छाननी, २७ सप्टेंबरला उमेदवारी मागे घेणे, २८ सप्टेंबरला निवडणूक चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.११ आॅक्टोबरला मतदान तर १२ आॅक्टोबरला मतमोजणी केली जाणार आहे.
काँग्रेस, भाजपा व बसपा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 1:27 AM
महापालिकेच्या प्रभाग ३५(अ) या जागेसाठी ११ आॅक्टोबरला पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारपर्यंत १४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
ठळक मुद्देप्रभाग ३५ (अ) पोटनिवडणूक : गवई, डांगे, ढोके यांच्यासह १४ जणांचे उमेदवारी अर्ज