नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण समााप्त झाल्याच्या मुद्द्यावर काँग्रेस-भाजपा आमोरासमोर आले आहेत. दोन्ही पक्षांनी या मुद्यावर शनिवारी आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. भाजप या विषयावर राज्य सरकारला जबाबदार धरत आहेत. तर काँग्रेसने यासाठी केंद्र सरकारला जबाबदार ठरविले आहे.
भाजप शनिवारी सकाळी १० वाजता ओबीसीला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी व्हेरायटी चौकात चक्का जाम आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करीतल, असे भाजपचे शहर अध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी सांगितले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे सर्वोच्च न्यायालयात ओबीसीचे आरक्षण रद्द झाल्याचा आरोपही त्यांनी केला. याा आंदोलनात पक्षाचे खासदार, आमदार, पदाधिकारी सहभगी होतील.
दुसरीकडे काँग्रेसही शनिवारी सकाळी ११ वाजता ब्लॉक स्तरावर आंदोलन करणार आहे. शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी ही माहिती दिली. ओबीसी आरक्षण रद्द होण्यासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रातील मोदी सरकारमुळेच ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकू शकले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.