लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेने केलेली पाणी दरवाढ व यात आयुक्तांनी घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची आहे. यावर काँग्रेस नेते गप्प का? असा सवाल मनपातील सत्ताधाऱ्यांनी केला आहे. तर पाणी दरवाढ ही भाजपचेच पाप आहे. मनपातील सत्ताधाऱ्यांनी सभागृहात ठराव मंजूर करून पुढील तीस वर्षांपर्यंत दरवर्षी पाच टक्के दरवाढीचा निर्णय घेतला. आपले पाप झाकण्यासाठी दुसºयावर आरोप करीत असल्याचा पलटवार काँग्रेसने केला आहे.काँग्रेस गप्प का - संदीप जाधवआर्थिक संकटात असलेल्या नागरिकांवर पुन्हा आर्थिक बोजा वाढविण्यात येऊ नये, पाणी दरवाढ मागे न घेतल्यास १३ आॅगस्टपासून आयुक्तांच्या कक्षासमोर भाजपचे सर्व १०८ नगरसेवक आंदोलन करतील, असा इशारा देत या या दरवाढीवर काँग्रेस नेते गप्प का, असा सवाल मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी केला आहे.नागपूर शहराचे पालकमंत्री हे काँग्रेसचे आहेत. पाणी दरवाढीला तेही जबाबदार राहतील. आयुक्त असे उलटसुलट निर्णय घेतात आणि पालकमंत्री मात्र त्यात हस्तक्षेप करीत नाहीत. काँग्रेसचे नगरसेवकही मूग गिळून गप्प का आहेत? कोरोना काळातच ही दरवाढ का? आयुक्त तुकाराम मुंढे यांना पुढे करून काँग्रेस पक्षाने रचलेले हे षड्यंत्र तर नाही ना, अशी शंकाही संदीप जाधव यांनी उपस्थित केली आहे.हे तर भाजपचेच पाप - प्रफुल्ल गुडधेसंदीप जाधव हे भाजपाचे मनपातील जबाबदार नेते आहेत. त्यांनी काँग्रेसवर बालिशपणाचा खोटारडा आरोप करू नये. मनपा सभागृहात त्यांच्याच पक्षाने बहुमताच्या बळावर पुढील तीस वर्षांसाठी दरवर्षी पाणी दरवाढीचा निर्णय घेतला आहे. हे एक षड्यंत्र होते. काँग्रेसने अशा दरवाढीला विरोध दर्शविला होता. मात्र सभागृहात बहुमताच्या बळावर भाजपने हा ठराव पारित केला आणि शहरातील जनतेच्या डोक्यावर पाणी दरवाढ लादली. जाधव यांनी जनाची नाही तर मनाची लाज ठेवावी. पाणी दरवाढ ही भाजपाचेच पाप आहे, असा पलटवार काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी भाजपवर केला आहे.