वीरसिंग यांची टीका : बसपाची विदर्भस्तरीय आढावा बैठकनागपूर : निवडणुका तोंडावर असल्या की काँग्रेस नेते राहुल गांधी दलिताच्या घरी जेवायला जातात. भाजप नेतेही इंदू मिल, लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घर आदींबाबत तडकाफडकी लक्ष घालतात. निवडणुकीत दलितांची मते खेचण्यासाठी या दोन्ही पक्षाची धडपड सुरू असते. यांना फक्त तेव्हाच दलित आठवतात, अशी टीका करीत या दोन्ही पक्षांपासून दलितांसह आदिवासी, ओबीसी बांधवांनी सावध राहावे, असे आवाहन बसपाचे महाराष्ट्र प्रभारी खा. वीरसिंग यांनी केले.बसपाची विदर्भस्तरीय आढावा बैठक मंगळवारी सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघाच्या संकुलात पार पडली. बैठकीला खा. वीरसिंग यांच्यासह प्रदेश अध्यक्ष विलास गरुड, कृष्णा बेले, प्रभारी प्रेम रोडेकर, प्रदेश सरचिटणीस जितेंद्र मैस्कर, प्रदेश मीडिया प्रभारी सागर डबरासे, जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर, संदीप ताजने, उत्तम शेवळे, विश्वास राऊत, मंडळ समन्वयक विवेक हाडके, पृथ्वीराज शेंडे, महेश साहारे आदी उपस्थित होते. यावेळी विदर्भातील अकराही जिल्ह्यांचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. यावेळी खा. वीरसिंग म्हणाले, राज्यात काही पदाधिकारी काम करताना दिसत नाही. त्यांना काम करणे जमत नसेल तर त्यांनी पद सोडावे. येत्या काळात जिल्हास्तरावर जाऊन आढावा घेतला जाईल व काम समाधानकारक न आढळल्यास पदमुक्त केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. राज्यात ६० टक्के पदे युवकांना दिली जातील, असेही त्यांनी जाहीर केले. विलास गरुड म्हणाले, राज्यात अनुसूचित जातीच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार होत आहेत. याविरोधात रस्त्यावर येऊन नारेबाजी केल्याने न्याय मिळत नाही. त्यासाठी आपली सरकार बनवावी लागेल. त्यासाठी संघटन मजबूत करावे लागेल. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हा, विधानसभा मतदारसंघ ते बूथपर्यंत संघटन मजबूत करावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी राजू बसवनाथे, मिलिंद बनसोड, राजकुमार बोरकर, अविनाश वानखडे, मोहन राईकवार, सुनील डोंगरे, आनंद सोमकुवर, चंद्रशेखर कांबळे, रोहित वालदे, दिनेश रंगारी यांच्यासह विदर्भातील पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
काँग्रेस-भाजपला निवडणुका पाहून दलित आठवतात
By admin | Published: February 03, 2016 3:11 AM