नगरसेवकांची सहल पोहचली निवडणूक आयाेगाच्या टेबलवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 10:54 AM2021-12-05T10:54:17+5:302021-12-05T11:15:51+5:30
भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. विधान परिषद निवडणूक होत असलेल्या मतदारसंघातील जवळपास २००० व्यक्तींना देशातील विविध ठिकाणी पर्यटनाला पाठविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
नागपूर : भाजपचे नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांची सहल वादाच्या भाेवऱ्यात सापडली आहे. त्यांना सहलीला नेण्यावरून काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषद निवडणुकीतील मतदारांना बाहेर पाठविल्याचा आक्षेप घेत बावनकुळे यांची उमेदवारी रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी भोयर यांनी केली आहे.
भाेयर यांनी केलेल्या तक्रारीनुसार, भाजप उमेदवार बावनकुळे यांनी विधान परिषद निवडणुकीपूर्वी मतदार संघातील जवळपास २ हजार लोक व त्यांच्या कुटुंबीयांना उचलून नेले व विविध ठिकाणी ठेवले आहे. हे सर्व विधान परिषद निवडणुकीतील मतदार आहेत. हा प्रकार राजकीय पक्ष व उमेदवारांना लागू असलेल्या माॅडेल काेड ऑफ कंडक्टचे सर्रास उल्लंघन असून बावनकुळे यांनी चालविलेला हा प्रकार अनैतिक आणि बेकायदेशीर आहे, ‘रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट, १९५१’ च्या कलम १२३ नुसार भ्रष्ट प्रथेत समाविष्ट असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
नागरिकांना मतदानाचा हक्क मुक्तपणे वापरता यावा आणि मुक्त व निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी अशा अनुचित प्रकारावर कठाेर कारवाई करावी, बावनकुळे यांनी कायदा पायदळी तुडविल्याने त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी भाेयर यांनी निवडणूक आयाेगाकडे केली आहे.
पराभव दिसत असल्यामुळेच बेताल आरोप
भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले व उमेदवारी मिळवलेले छोटू भोयर हे पहिल्या दिवसापासूनच बेताल आरोप करीत आहेत. त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली पण गटबाजीत गुंतलेली काँग्रेस नेत्यांची साथ मिळेनाशी झाली आहे. आता खूप मोठा दारुण पराभव दिसत असल्यामुळे असे बालिश आरोप करून भोयर हे स्वत:चे हसू करुन घेत आहेत. त्यांच्या एकाही आरोपात काही तथ्य नाही
- अविनाश ठाकरे, सत्तापक्ष नेते, मनपा, नागपूर