नागपूर : केंद्र सरकारने लागू केलेले तीनही कृषी कायदे रद्द करावेत, तसेच इंधन दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी काँग्रेसने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मुंबई राजभवनात घेराव घालण्याची रणनीती आखली होती. मात्र, राज्यपाल १२ ते १७ जानेवारीपर्यंत नागपूर-विदर्भ दौऱ्यावर आले. त्यामुळे काँग्रेसनेही राज्यपालांचा पाठलाग करीत आपला कार्यक्रम बदलला आहे. आता काँग्रेसतर्फे १६ जानेवारी रोजी नागपुरातील राजभवनावर मोर्चा काढून राज्यपालांना घेराव घातला जाणार आहे. प्रदेश काँग्रेसतर्फे १६ जानेवारी हा दिवस किसान अधिकार दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिवसानिमित्त महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते, आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार कार्यकर्त्यांचा फौजफाटा घेऊन दुपारी १२ वाजता नागपूर राजभवनावर धडक देणार आहेत. विशेष म्हणजे कोरोना अद्याप संपला नसला तरी या मोर्चासाठी गर्दी जुळविण्याच्या सूचनाही शहर व जिल्हाध्यक्षांना देण्यात आल्या आहेत. एकूणच राज्यपालांना घेराव घालून देशात एक संदेश देण्याचा काँग्रेसचा मानस आहे.
- आशिष दुआ यांनी घेतली बैठक
- मोर्चाच्या तयारीसाठी अ.भा. काँग्रेस समितीचे सचिव आशिष दुआ यांनी बुधवारी नागपुरात बैठक घेतली. तीत नागपूर शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, ज्येष्ठ नेते नाना गावंडे, आ. राजू पारवे, आ. अभिजित वंजारी आदी उपस्थित होते. यावेळी स्थानिक नेत्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी गुरुवारी नागपुरात दाखल होणार असून, ते स्थानिक नेत्यांची बैठक घेणार आहेत.