काँग्रेसचा नागपूर मनपावर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 01:11 AM2018-08-07T01:11:01+5:302018-08-07T01:11:45+5:30

Congress conducts attack on Nagpur municipality | काँग्रेसचा नागपूर मनपावर हल्लाबोल

काँग्रेसचा नागपूर मनपावर हल्लाबोल

Next
ठळक मुद्देसत्ताधाऱ्यांच्या अतिक्रमणाला संरक्षण अन् लहान व्यापाऱ्यांच्या दुकानावर बुलडोजर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे गेल्या तीन वर्षापासून शहरातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवरील खड्डे, सत्ताधाऱ्यांच्या अतिक्रमणाला संरक्षण व लहान व्यापाऱ्यांच्या खासगी जागेतील दुकानावर हातोडा, निकृष्ट दर्जाची सिमेंट रोडची कामे, मेट्रोच्या कामामुळे होणारा त्रास, बंद पथदिवे, अनियमित बससेवा व पाणीपुरवठ्याची समस्या तसेच वस्त्यांतील धार्मिक स्थळांवर होत असलेली कारवाई अशा ज्वलंत समस्यांकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात सोमवारी महापालिका मुख्यालयावर हल्लाबोल करून प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली.
रस्ते रुंदीकरणाच्या नावावर व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता कायद्याचा धाक दाखवून व्यापाऱ्यांची दुकानेही जमीनदोस्त करण्याचे काम सुरू आहे. मात्र सत्तापक्षातील नगरसेवकांच्या अतिक्रमणावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. कारवाईत होत असलेला भेदभाव थांबवून अन्यायकारक कारवाई थांबविण्याची मागणी विकास ठाक रे यांनी महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्याक डे केली. शिष्टमंडळात उमाकांत अग्निहोत्री, अ‍ॅड. अभिजित वंजारी, नरेश गावंडे, संजय महाकाळकर, नगरसेवक संदीप सहारे, रमेश पुणेकर, मनोज सांगोळे, हरीश ग्वालबंशी, दर्शनी धवड, माजी नगरसेवक मनोज साबळे, उपाध्यक्ष बंडोपंत टेंभुर्णे, गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, जयंत लुटे, डॉ.मनोहर तांबुलकर, जयाल जैसनानी, प्रशांत धवड, रमण पैगवार, धरम पाटील, इर्शाद अली, देवा उसरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पावसाळ्याच्या दिवसातही शहरातील काही वस्त्यांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तक्रार करूनही नागरिकांना न्याय मिळत नाही.
शहरातील अनेक मार्गांवरील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या अंधारात चोरीचे प्रकार वाढले आहेत. याला आळा घालण्यात यावा. शहर बससेवा सुरळीत चालावी यासाठी आॅपरेटर बदलण्यात आला; परंतु परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. शहरातील कचरा व्यवस्थित उचलला जात नाही. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे लागल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अद्याप नागरिकांना हिरव्या व निळ्या डस्टबीन मिळाल्या नसल्याचे विकास ठाकरे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणले.

सत्ताधारी नगरसेवकांच्या अतिक्रमणाला अभय
गोपालनगर भागात भाजपाचे नगरसेवक प्रमोद तभाने यांनी वर्दळीच्या रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे. यामुळे वाहनांचे अपघात होत आहेत. असे असूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. सोमवारी लक्ष्मीनगर झोनच्या पथकाने भाजपाचे नगरसेवक संदीप गवई यांच्या अतिक्रमणावर कारवाई केली नाही. मात्र त्यांच्या बाजूच्या व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणावर हातोडा चालविला. सत्ताधारी
नगरसेवकांच्या अतिक्रमणाला अभय अन् सामान्यांच्या बांधकामावर बुलडोझर हा प्रकार बंद करण्याची मागणी शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली.

न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई
अनधिकृत धार्मिक स्थळावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुासर कारवाई सुरू आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर चर्चा करता येणार नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. नगरसेवकांच्या निधीत कपात केलेली नाही. प्रशासकीय शिस्त लागावी यासाठी परिपत्रक काढल्याची माहिती त्यांनी दिली.

 

Web Title: Congress conducts attack on Nagpur municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.