ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि.19 - काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होईल, अशी चिन्हे दिसू लागली असतानाच आता काँग्रेसने घेतलेल्या विरोधी भूमिकेमुळे पुन्हा ‘बिघाडी’ होण्याची शक्यता वाढली आहे. गुरुवारी शहर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रवादीशी कोणत्याही परिस्थितीत आघाडी करू नये, असा ठराव सर्वानुमते रितसर मंजूर करण्यात आला. संबंधित ठराव मंजूर करीत काँग्रेसने आपण राष्ट्रवादीशी हात मिळविण्यास इच्छुक नसल्याचा इरादा उघड केला आहे.
शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महामंत्री डॉ. गजराज हटेवार यांनी ठराव मांडला. उपाध्यक्ष राजू व्यास, सरचिटणीस बंडोपंत टेंभूर्णे, जयंत लुटे, संदेश सिंगलकर, प्रा. दिनेश बानाबाकोडे, सुभाष भोयर, श्रीकांत ढोलके यांनी अनुमोदन केले. सर्वानुमते हात उंचावून ठराव मंजूर करण्यात आला. नोटाबंदी विरोधात गुरुवारी काँग्रेसने रिझर्व्ह बँकेसमोर केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात यावा, असे सूतोवाच केले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसने मंजूर केलेल्या या ठरावाला विशेष महत्त्व आले आहे.
संक्रांतीच्या पूर्व संध्येला राष्ट्रवादीचे आ. प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्त्वात एक शिष्टमंडळ काँग्रेसचे माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांच्याकडे आघाडीची बोलणी करण्यासाठी गेले होते. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, अशी इच्छा व्यक्त करीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मैत्रीसाठी हात पुढे केला होता. मात्र, या संबंधीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजीचा सूर आवळला. शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दुसºयाच दिवशी आघाडी करणार नाही, अशी भूमिका मांडली. त्यामुळे दोन्ही पक्षातील मिटलेली दरी पुन्हा वाढली. अशातच काँग्रेसची बोलणी सुरू असलेल्या मुस्लिम लीगला राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अनिल देशमुख यांनी सोबत घेत युती केल्याचे जाहीर केले व काँग्रेसवरील दबाव वाढविला. एक दिवसानंतर आ. प्रकाश गजभिये यांनी बसपाचे प्रदेश अध्यक्ष विलास गरूड यांची भेट घेत युतीचा प्रस्ताव दिला. राष्ट्रवादी एकीकडे काँग्रेस नेत्यांकडे चालत जाऊन आघाडीचा प्रस्ताव देते व दुसरीकडे परस्पर इतर पक्षांशी युतीची बोलणीही करते ही बाब काँग्रेसला खटकली आहे. आघाडी न करण्याचा ठराव घेऊन काँग्रेसने एकप्रकारे राष्ट्रवादीला उत्तर दिल्याचे मानले जात आहे.
असा आहे राष्ट्रवादीविरोधी ठराव
महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत आहे. चारही जागांवर राष्ट्रवादीचा प्रभाव असलेला एकही प्रभाग नाही. त्यामुळे राष्ट्रवादीशी आघाडी करण्यात अर्थ नाही. आघाडीत राष्ट्रवादीसाठी जागा सोडण्यात आल्यामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्ता दुखावल्या जातो. परिणामी त्या प्रभागात पक्षाची ताकद नाहीशी होते. आघाडी करूनही राष्ट्रवादीची कुठलिही मदत काँग्रेसला होत नाही. उलट काँग्रेसच्या मदतीवर राष्ट्रवादी उभी राहते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करू नये.