काँग्रेस नगरसेविका गार्गी चोपरा यांच्यावर कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:38 AM2018-04-13T00:38:32+5:302018-04-13T00:38:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या झोन सभापतींच्या निवडणुकीत भाजपाचे नऊ तर बसपाचा एक सभापती निवडून आला. १० नगरसेवक असूनही बसपाला सभापतिपद मिळाले तर २९ सदस्य असलेल्या काँग्रेसचा एकही सभापती निवडून आला नाही. आसीनगर झोनमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांनी बसपाला पाठिंबा दिला. मंगळवारी झोनमध्येही काँग्रेस व बसपा एकत्र आले. परंतु काँग्रेसच्या नगरसेविका गार्गी प्रशात चोपरा अनुपस्थित राहिल्याने येथे भाजपाच्या संगीतागिऱ्हे एक मताने विजयी झाल्या. अनुपस्थित राहून त्यांनी भाजपाला मदत केल्याने काँग्रेस गार्गी चोपरा यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.
मंगळवारी झोनमध्ये भाजपा ८, काँग्रेस ५ व बसपा ३ असे संख्याबळ आहे. परंतु भाजपाच्या संगीता गिऱ्हे एक मताने विजयी झाल्या. गिऱ्हे यांना आठ तर बसपाचे नरेंद्र वालदे यांना सात मते मिळाली. काँग्रेसच्या ४ नगरसेवकांनी वालदे यांना मतदान केले. सभापतिपदासाठी काँग्रेसच्या रश्मी धुर्वे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रभागातील काँग्रेसच्या नगरसेवकांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. परंतु गार्गी चोपरा अनुपस्थित असल्याने धुर्वे यांनी उमेदवारी मागे घेतली. अन्यथा बसपाच्या मदतीने काँग्रेस उमेदवारालाही आठ मते मिळाली असती. ईश्वर चिठ्ठीत काँग्रेस उमेदवाराला निवडून येण्याची संधी होती.
महापालिका निवडणुकीपूर्वी गार्गी चोपरा यांचे पती डॉ. प्रशांत चोपरा काँग्रेसमध्ये होते. मात्र निवडणुकीनंतर त्यांनी भाजपात प्रवेश घेतला. त्यामुळे भाजपाचा उमेदवार निवडून येण्यासाठी गार्गी चोपरा यांनी अनुपस्थित राहून मदत केल्याचा आरोप काँग्रेसमधूनच होत आहे.
आसीनगर झोनमध्ये १६ नगरसेवक आहेत. यात भाजपा तीन, बसपा सात तर काँग्रेसच्या सहा नगरसेवकांचा समावेश आहे. येथे काँग्रेसने बसपाला मदत केल्याने मंगळवारी झोनमध्ये काँग्रेस व बसपाला एकत्रित निवडणूक लढता आली असती. देशभरातील राजकीय घडामोडी विचारात घेता नागपुरातही काँग्रेस - बसपाला एकत्र येण्यात अडचण नव्हती. परंतु गार्गी चोपरा यांच्यामुळे यात बाधा निर्माण झाल्याची चर्चा आहे.
चोपरा शहरात नव्हत्या
सभापतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या निर्देशानुसार मतदान करावे, यासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांना व्हीप बजावण्यात आला होता. मात्र गार्गी चोपरा नागपुरात नव्हत्या. त्यामुळे त्या मतदानासाठी उपस्थित नव्हत्या. भाजपाला रोखण्यासाठी आसीनगर व मंगळवारी झोनमध्ये काँग्रेस व बसपाने एकत्र यावे, यासाठी प्रयत्न केले. परंतु यात यश आले नाही.
तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते महापालिका